दक्षिणात्य मेगा सुपरस्टार सूर्याच्या (Surya) आगामी चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. काल 23 जून 2023 रोजी सूर्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याचा आगामी चित्रपट 'कांगुवा'चा (Kanguva) टीझर प्रदर्शित करण्यात आला. ग्रीन के. ई. ज्ञानवेलराजा (Green K. E.Gnanavel Raja) स्टुडिओने युवी क्रिएशन वामसी प्रमोद (UV Creations Vamsi Pramod) यांच्या सोबत मिळून या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर दक्षिणात्य सुप्रसिद्ध दिग्दर्शक शिवाने (Shiva) या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
हा चित्रपट 10 भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात येणार असून यामध्ये सूर्याच्या लुकने प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे. या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या निमित्ताने या चित्रपटाचे बजेट किती आहे? त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
उत्कंठा वाढवणारा टीझर
Source: Aniket Nikam Creations
दाक्षिणात्य सुपरस्टार सूर्याचा आगामी चित्रपट 'कांगुवा'चा टीझर 23 जुलै रोजी प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर चाहत्यांच्या चित्रपटाबद्दलच्या अपेक्षा वाढल्या आहेत. 2 मिनिटांचा हा टीझर अतिशय रोमांचकारक असून काही वेळात 5 मिलियनहून अधिक वेळा तो पाहिला गेला आहे. या चित्रपटात अभिनेता सूर्या शिवाय अभिनेत्री दिशा पटानी (Disha Patani), योगी बाबू (Yogi Babu), किंग्सले (Kingsley), कोवई सरला (Kovai Sarala) आणि आनंदराज (Anandraj) यासारख्या कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत.
ग्रीन स्टुडिओने आत्तापर्यंत मद्रास (Madras), टेडी (Teddy), पारुथी विरण (Paruthiveeran), सिरूथाई (Siruthai), कोंबन (Komban), नान महान (Naan Mahan) आणि पथू थाला (Pathu Thala) यासारखे अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट इंडस्ट्रीला दिले आहेत. त्याचप्रमाणे आता आगामी 'कांगूवा' हा चित्रपट देखील चांगलीच कमाई करेल, असा अंदाज बांधण्यात येत आहे.
चित्रपटाचे बजेट जाणून घ्या
कांगुवा हा चित्रपट 10 भाषांमध्ये प्रदर्शित करण्याचा निर्णय चित्रपट निर्मात्यांनी घेतला आहे. या निर्णयानंतर चाहत्यांमध्ये अतिशय आनंदाचे वातावरण आहे. हा चित्रपट थ्रीडी फॉरमॅटमध्ये बनवला आहे. सध्या कांगुवाचा टीझर तामिळ, तेलगू, मल्याळम, कन्नड, हिंदी आणि इंग्रजी भाषेत रिलीज करण्यात आला आहे. पण लवकरच निर्माते इतर भाषांमध्ये याचा टीझर रिलीज करणार आहेत.
हा चित्रपट एक बिग बजेट चित्रपट आहे. 350 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये हा चित्रपट तयार करण्यात आला आहे. त्यामुळे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर हा चित्रपट किती कोटींची कमाई करेल, याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.