‘सहारा घोटाळा’ हा देशातील आतापर्यंत झालेल्या आर्थिक गैरव्यवहारातील सर्वात चर्चित घोटाळा राहिला आहे. याचे कारण म्हणजे या घोटाळ्यात थोडेथोडके नाही तर देशभरातील 10 कोटी लोकांचा पैसा गुंतवला गेला होता. चीट फंड कंपनीच्या नावाखाली सहाराने सामान्य नागरीकांना अधिक परतावा देण्याचे आमिष दाखवले आणि तब्बल 86 हजार कोटींची माया जमवली. सेबीने ‘सहारा’ वर कारवाई करत गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत करण्याचे आदेश दिले, मात्र कंपनीला तसे करता आले नाही. 2009 पासून आजतागायत गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे मिळालेले नाहीत. कित्येक सामान्य गुंतवणूकदार असलेले शेतकरी, मजूर निधन पावले आहेत. अशातच सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत करण्याची कारवाई केंद्र सरकारने सुरु केली आहे.सहारा समूहाच्या चार सहकारी संस्थांमध्ये जमा केलेले गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्यासाठी स्वतः गृहमंत्री अमित शाह यांनी पुढाकार घेतला आहे. ‘Sahara Refund Portal’ द्वारे सर्व गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे मिळतील अशी माहिती मंत्री अमित शाह यांनी दिली होती. त्यानुसार गुंतवणूकदारांनी त्यांच्या पैशासाठी क्लेम करण्यास सुरुवात केली आहे.
केंद्र सरकारने ज्या उद्देशाने सहारा पोर्टल सुरू केले होते ते उद्दिष्ट आता हळूहळू पूर्ण होत आहे. सहारा समूहाच्या चार सहकारी संस्थांमधील ठेवी परत मिळवण्यासाठी या संदर्भात सुरू करण्यात आलेल्या पोर्टलवर आतापर्यंत सात लाख गुंतवणूकदारांनी नोंदणी केली आहे. ज्या गुंतवणूकदारांचे निधन झाले आहे, त्यांचे वारस देखील यात सहभागी आहेत. या क्लेमचा निपटारा करण्यासाठी सरकारने स्पेशल नोडल ऑफिसर्सची नियुक्ती केली आहे. Sahara Refund Portal वर आतापर्यंत एकूण 150 कोटी रुपयांचे दावे प्राप्त झाले आहेत.
10 कोटी गुंतवणूकदार
सहारामध्ये देशभरातील सुमारे 10 कोटी गुंतवणूकदारांनी पैसे गुंतवले होते. सहकार मंत्री अमित शाह यांनी 18 जुलै रोजी Sahara Refund Portal लाँच केले.त्यावेळी त्यांनी गुंतवणूकदारांना पैसे कसे मिळतील याची माहिती दिली होती. क्लेम केल्यानंतर 45 दिवसांच्या आत गुंतवणूकदारांच्या बँक खात्यावर पैसे जमा होतील अशी माहिती त्यांनी दिली होती.
पैसे कुठून मिळणार?
2009 मध्ये सेबीने सहारा विरोधात कारवाई सुरु केल्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले होते. काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने सहारा-सेबी रिफंड खात्यातून 5,000 कोटी रुपये सेंट्रल रजिस्ट्रार ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटीज (CRCS) च्या खात्यात हस्तांतरित करण्याचे निर्देश दिले होते. याच पैशातून गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत दिले जाणार आहे. व्यवहारात पारदर्शकता असावी म्हणून सरकारने पोर्टल सुरु केले आहे.
पहिल्या टप्प्यात 10 हजार रुपये मिळणार
सहारात गुंतवणूक करणाऱ्यांना पहिल्या टप्प्यात केवळ 10 हजार रुपयांचा परतावा दिला जात आहे. गुंतवणूकदारांनी कितीही गुंतवणूक केली असेल तरीही त्यांना 10 हजार रुपयांपर्यंतचा परतावा दिला जात आहे. उरलेले पैसे कधी मिळणार अशी विचारणा सध्या गुंतवणूकदार करत आहेत. यावर उत्तर देताना संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले की, पहिल्या टप्प्यात छोट्या गुंतवणूकदारांना पैसे परत केले जाणार असून, दुसऱ्या टप्प्यात पुन्हा सुप्रीम कोर्टात जाऊन पैशांची मागणी केली जाणार असल्याचे म्हटले होते.