अल्प बचत योजनांमध्ये (Small Saving Scheme) गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना उत्पन्नाचा पुरावा (Income Proof) द्यावा लागणार आहे. अल्प बचत योजनांचे व्यवस्थापन करणाऱ्या टपाल खात्याने गुंतवणूकदारांच्या केवायसी संदर्भात सुधारित नियमावली जारी केली आहे. त्यानुसार अल्प बचत योजनांमध्ये 10 लाख किंवा त्याहून अधिक गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना यापुढे इन्कम प्रुफ द्यावा लागेल.
मनी लॉंडरिंग किंवा दहशतवादी कारवायांसाठी केला जाणारा अर्थपुरवठा रोखण्यासाठी सरकारने कठोर पावले उचलली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पोस्ट खात्याने गुंतवणूकदारांसाठी ओळखपत्रांबाबत सुधारित नियमावली 25 मे 2023 रोजी जारी केली आहे. अल्प बचत योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास आता गुंतवणूकदारांना पॅनकार्ड, आधारकार्ड या नेहमीच्या ओळखपत्रांसह उत्पन्नाचा स्त्रोत सादर करावा लागला आहे.
पोस्टा खात्याने अधिकाऱ्यांना तशा प्रकारच्या सूचना दिल्या आहेत. अल्प बचत योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या काही निवडक गुंतवणूकदारांचे केवायसी आणि इन्कम प्रुफचा तपशील घेण्याचे निर्देश दिले आहेत. यात त्यांच्या उत्पन्नाचा सोर्स काय याचा तपशील या गुंतवणूकदारांना द्यावा लागणार आहे.
नव्या नियमावलीनुसार गुंतवणूकदारांना त्यांच्या गुंतवणूक जोखीमेनुसार वर्गीकरण करण्यात आले आहे. त्यानुसार उच्च जोखीम असणाऱ्या गुंतणूकदारांना त्यांच्या केवायसीबरोबरच उत्पन्नाचा स्त्रोत द्यावा लागणार आहे. अल्प बचतीच्या योजनांमध्ये 10 लाख रुपयांहून अधिक गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांचा या श्रेणीत समावेश आहे.
मध्यम प्रकारच्या जोखीम श्रेणीत अल्प बचत योजनांमध्ये किमान 50000 रुपये ते 10 लाखांपर्यंत ज्यांनी गुंतवणूक केली आहे, अशा गुंतवणूकदारांचा समावेश आहे.सर्वात कमी जोखीमेच्या गटात अल्प बचत योजना किंवा बचत योजनांमध्ये किमान 50000 रुपयांची गुंतवणूक केलेली आहे अशा गुंतवणूकदारांचा समावेश आहे.
राजकीय पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींची खाती उच्च जोखमीच्या श्रेणीत आहेत. यात राज्यांचे प्रमुख, वरिष्ठ राजकीय नेते, सरकारी अधिकारी, लष्करी अधकारी, सरकारी महामंडळे आणि कंपन्यांचे प्रमुख आणि कुठल्याही राजकीय नेत्यांना अल्प बचत योजनांमध्ये गुंतवणू करताना आता उत्पन्नाचा पुरावा सादर करावा लागणार आहे.
पोस्टाच्या अधिसूचनेनुसार गुंतवणूकदारांना उत्पन्नाचा स्त्रोत स्पष्ट करणारा पुरावा सादर करावा लागेल. यात बँक/पोस्ट ऑफिस अकाउंट स्टेटमेंट, ITR, सेल डीड, गिफ्ट डीड, मृत्यूपत्र किंवा असे डॉक्युमेंट्स ज्यातून उत्पन्नाचा स्त्रोत स्पष्ट होईल.