Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Credit or Debit Card: आर्थिक व्यवहार करण्यासाठी क्रेडिट कार्ड वापरावे की डेबिट कार्ड? जाणून घ्या

Credit or Debit Card

Image Source : www.dignited.com

Credit or Debit Card: तुम्हालाही खरेदी केल्यानंतर पैशांचा व्यवहार करण्यासाठी डेबिट कार्ड वापरावे की क्रेडिट कार्ड असा प्रश्न पडतो का? या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी डेबिट आणि क्रेडिट कार्डचे फायदे जाणून घ्या. तसेच आर्थिक व्यवहार करताना कोणत्या कार्डचा वापर करावा हे देखील जाणून घेऊयात.

आपल्या सगळ्यांचेच बँकेमध्ये खाते आहे. याच खात्यावरील पैशांचे आर्थिक व्यवहार करण्यासाठी बँक आपल्याला डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डची सुविधा पुरवते. आपल्यापैकी बहुतांश लोकांकडे डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड हे असतेच. बऱ्याच वेळा आपण शॉपिंगला गेल्यानंतर सहजपणे कोणत्याही कार्डचा वापर करून आर्थिक व्यवहार करतो. मात्र आर्थिक व्यवहार करण्यासाठी क्रेडिट कार्ड वापरावे की डेबिट कार्ड? असा प्रश्न अनेकांना वारंवार पडतो. या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी दोन्ही कार्डचे फायदे काय जाणून घेणे गरजेचे आहे. जेणेकरून पुढच्या वेळी तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत खरेदीला गेल्यानंतर किंवा कोणतीही बिले भरताना योग्य त्या कार्डचा वापर कराल.

क्रेडिट कार्डचे फायदे जाणून घ्या

गेल्या काही वर्षांमध्ये क्रेडिट कार्डचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. आकर्षक बक्षिसे, कॅशबॅक ऑफर व खरेदी करताना मिळणारे रिवॉर्ड्स यासारख्या सुविधांमुळे क्रेडिट कार्डच्या वापराकडे लोकांचा कल वाढला आहे. मात्र हे क्रेडिट कार्ड वापरताना आणि आर्थिक व्यवहार करताना काळजी घेणे गरजेचे आहे.

क्रेडिट कार्ड तुम्हाला बँकेत पैसे नसतानाही पैसे खर्च करण्याची सुविधा देते. मात्र त्या बदल्यात त्यांनी निश्चित करून दिलेल्या कालावधीत त्या पैशांची परतफेड करणे गरजेचे असते. ऑनलाईन खरेदी करत असताना बँकांकडून क्रेडिट कार्ड धारकांना विविध प्रकारच्या वेलकम ऑफर्स दिल्या जातात. यामध्ये भेट वस्तू व्हाउचर, डिस्काउंट किंवा बोनस, रिवॉर्ड्स पॉईंट्सच्या स्वरूपात ग्राहकांना मिळतात.

तुम्ही तुमच्या वाहनात इंधन भरण्यासाठी जी रक्कम खर्च करता, ती रक्कम जर क्रेडिट कार्डद्वारे दिलीत तर क्रेडिट कार्डधारकाला फ्यूल सरचार्ज सवलत देण्यात येते. काही क्रेडिट कार्ड देशांतर्गत विमानतळांवर तसेच आंतरराष्ट्रीय विमानतळांवर वर्षातून एकदा किंवा अधिक वेळा आराम करण्याची किंवा जेवणाची सुविधा देतात.

ट्रॅव्हल केंद्रित क्रेडिट कार्ड आणि प्रीमियम क्रेडिट कार्डवर या ऑफर्स दिल्या जातात. महत्त्वाचं म्हणजे तुम्ही मोठी खरेदी केली, तर त्या खरेदीचे ईएमआयमध्ये रूपांतर करून त्याचे हप्ते भरण्याची सोय क्रेडिट कार्डच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येते.

डेबिट कार्डचे फायदे जाणून घ्या

बऱ्याच वेळा शॉपिंगला गेल्यानंतर आपण कोणत्या कार्डने पेमेंट करावे, हे लोकांना सहज ठरवता येत नाही. त्यामागचे कारण म्हणजे लोकांच्या वॉलेटमध्ये डेबिट आणि क्रेडिट कार्ड दोन्हीही असतात. डेबिट कार्डच्या मदतीने तुम्ही खरेदी करू शकता, किंवा थेट तुमच्या बँकेच्या खात्यातून पैसे देखील काढू शकता.

ज्यांना आपले खर्च नियंत्रित ठेवायचे आहेत आणि कर्जापासून दूर राहायचे आहे, त्यांच्यासाठी डेबिट कार्ड हा एक उत्तम पर्याय आहे. देशातील बहुसंख्य लोकांकडे डेबिट कार्ड आहे. बँकेमध्ये खाते ओपन केल्यानंतर मोफत मिळणाऱ्या सुविधेत डेबिट कार्डचा समावेश होतो.

डिजिटल इंडिया आणि युनिफाईड पेमेंट इंटरफेस म्हणजेच यूपीआय सारख्या उपक्रमांद्वारे डिजिटल अर्थव्यवस्थेकडे सरकारच्या वाढीमुळे डेबिट कार्डच्या वापराला आणखी चालना मिळाली आहे. ही सर्व कार्ड यूपीआय प्लॅटफॉर्मसह अखंडपणे जोडली गेली आहेत, ज्यामुळे मोबाईल बँकिंग ॲप्सद्वारे त्वरित आणि सुरक्षित आर्थिक व्यवहार करता येतात. या कार्डच्या मदतीने ग्राहक सर्व आर्थिक व्यवहार करू शकतात.

आर्थिक व्यवहार करताना कोणत्या कार्डचा वापर करावा?

डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डचा वापर हा विविध घटकांवर अवलंबून आहे. जबाबदारीने आणि आर्थिक शिस्तीने खर्च करू पाहणाऱ्यांसाठी डेबिट कार्ड हा एक उत्तम पर्याय म्हणून उपलब्ध आहे. याशिवाय यूपीआय व्यवहारांमध्येही त्याचा उपयोग केला जातो. तर क्रेडिट कार्ड्स हे वेगवेगळ्या फायद्यांसाठी वापरले जाते. क्रेडिट कार्डचा वापर करताना व्याजदर आणि निश्चित करून दिलेल्या मुदतीचा विचार करणे गरजेचे आहे. वेगवेगळे रिवॉर्ड्स, सवलती आणि ऑफर्सचा लाभ घेण्यासाठी क्रेडिट कार्ड फायद्याचे आहे.

Source: hindi.financialexpress.com