Credit Card: ऑनलाइन शॉपिंग करताना किंवा कोणतेही बिल पेमेंट करताना क्रेडिट कार्डचा वापर अनेकजण करतात. फायद्याची गोष्ट म्हणजे क्रेडिट कार्डवरून व्यवहार केल्यानंतर रिवॉर्ड पॉइंट किंवा कॅशबॅक मिळतात. पहिल्यांदाच नोकरी लागल्यावर सॅलरी अकाउंटसोबत बँक क्रेडिट कार्ड हमखास देते. मात्र, हे कार्ड बेसिक दर्जाचे असते. यावरील बेनिफिट आणि पैशांचे लिमिट कमी असते. मात्र, भविष्यात जसे तुमचे उत्पन्न, खर्च वाढतो, तसे तुम्हाला क्रेडिट कार्ड अपग्रेड करण्याची गरज आहे का? ते या लेखात पाहूया.
फक्त ऑफर्सला भुलून जाऊ नका?
तुमचे उत्पन्न, खर्च, क्रेडिट कार्डचा वापर, सिबिल स्कोअर अशा अनेक गोष्टी वित्तसंस्था आणि बँका ट्रॅक करत असतात. त्यामुळे ज्या ग्राहकांचे उत्पन्न, खर्च वाढतो, अशा ग्राहकांना बँक तत्काळ जास्त सुविधा असलेले क्रेडिट कार्ड देण्यास तयार होतात. मात्र, फक्त त्यावरील ऑफर्स आणि रिवॉर्ड पॉइंटला भुलून जाऊन अपग्रेड करून घेऊ नका. बऱ्याच वेळा प्रिमियम कार्डला शुल्क जास्त असतात. ही शुल्क किती? कार्डद्वारे दिली जाणारी बेनिफिट खरंच तुमच्या फायद्याची आहेत का? हे तपासून घ्या. त्यानंतरच निर्णय घ्या.
प्रिमियम कार्डमधील बेनिफिट कोणते?
प्रिमियम क्रेडिट कार्डवर विमान प्रवासावर जास्त डिस्काउंट, इंधन भरताना डिस्काउंट, विमानतळावरील लाऊंज सुविधा, प्रिमियम हॉटेल मेंबरशिप, शॉपिंगवर अधिक डिस्काउंट मिळू शकतो. इतरही अनेक बिनिफिट आहेत. मात्र, प्रिमियम कार्डला शुल्कही जास्त असते. समजा 30 हजार रुपये पगार असताना तुमच्याकडे बेसिक क्रेडिट कार्ड होते. मात्र, आता पगार 1 लाखाच्याही पुढे गेला आहे.
अशा परिस्थितीत तुम्हाला बँकेकडून प्रिमियम कार्ड दिले जाऊ शकते. मात्र, तुमचा खर्च कोणत्या गोष्टींवर जास्त होतो, ते पाहून कार्डची निवड करा. म्हणजे जर तुमचा विमान प्रवास जास्त असेल, किंवा काही ठराविक शॉपिंग साईटवर जास्त खरेदी करत असाल तर अशा ऑफर्ससाठीची कार्ड घेणं फायद्याचं ठरेल. फ्लिपकार्ट, अॅमेझॉन, एअरलाइन्स, हॉटेल्सशी मिळून अनेक बँका क्रेडिट कार्ड बाजारात आणतात त्याचा विचार तुम्ही करू शका.
क्रेडिट कार्डद्वारे किती खर्च करू शकता याचे लिमिट असते. जसा तुमचा क्रेडिट कार्डचा वापर वाढतो, तसे बँक लिमिट वाढवण्याच्या ऑफर्स देते. मात्र, एका ठराविक मर्यादेपेक्षा हे लिमिट बँक पॉलिसीमुळे वाढवता येत नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत प्रिमियम कार्ड तुम्ही घेऊ शकता.
वायफळ खर्च वाढत असेल तर अपग्रेड करू नका
काही क्रेडिट कार्डवर माइलस्टोन बेनिफिट दिले जातात. म्हणजेच एक ठराविक खर्चाच्या रकमेचा आकडा गाठल्यावर अतिरिक्त बेनिफिट दिले जातात. जर तुम्ही या माइलस्टोनच्या जवळ असाल तर क्रेडिट कार्ड अपग्रेड करू नका. हे बिनिफिट घेतल्यानंतर कार्ड अपग्रेड करून घ्या. जर क्रेडिट कार्डच्या वापराने तुमचा वायफळ खर्च वाढत असेल तर कार्ड अपग्रेड न केलेलेच बरे.