तुमच्याकडे कधी न कधी मित्राने, नातेवाईकांनी उधार पैसे मागितले असतील. किंवा तुम्ही देखील मित्राला, नातेवाईकांना उधारी मागितली असेल. परंतु आपल्या जवळच्या व्यक्तींसोबत आर्थिक व्यवहार करावेत का? केल्यास काय काळजी घ्यावी आणि पैशामुळे तुमचे संबंध बिघडू नयेत म्हणून काय खबरदारी घ्यावी हे आपण या लेखात बघणार आहोत.
एखाद्या मित्राला किंवा नातेवाईकाला उधारीत पैसे देणे हा एक कमालीचा गुंतागुंतीचा निर्णय असू शकतो, कारण त्यात आर्थिक आणि मानवी संबंध या दोन्हीचा तुम्हाला विचार करावा लागतो. खरे तर अडीनडीच्या काळात आपण मित्रांना, नातेवाईकांना आर्थिक मदत केलीच पाहिजे. परंतु दिलेले पैसे परत मिळणार नसतील आणि तुमच्या चांगुलपणाचा कुणी गैरफायदा घेत असेल तर तुम्ही वेळीच सावध राहायला हवं.
कुणावर वाईट वेळ आली असेल किंवा कुणाला पैशाची अत्यंत गरज असताना मित्र म्हणून, नातेवाईक म्हणून तुम्ही त्यांच्या मदतीला धावून गेलं पाहिजे. भविष्यात ततुमच्यावर जर अशी वेळ आली तर तुमच्यासाठी देखील तुमचे सगेसोयरे उभे राहिले पाहिजेत याचा देखील आपण विचार करायला हवा. खरे तर ही तुमची एक 'भावनिक गुंतवणूक' असते हे विसरू नका.
यासाठी तुम्ही ज्यांना आर्थिक मदत करणार आहात त्यांच्यासोबत पारदर्शी व्यवहार ठेवा. जर समोरची व्यक्ती पैसे परत करत नसेल तर त्याला वारंवार याची आठवण करून द्या. तसेच पैशामुळे आपले नातेसंबंध खराब होऊ नये यासाठी त्यांना देखील प्रयत्न करायला सांगा.
उधारी देण्यापूर्वी 'या' गोष्टींचा करा विचार
संवाद ठेवा: तुम्ही दिलेल्या उधारी बद्दल मित्र किंवा नातेवाईकाशी खुलेपणाने बोला. त्याची आर्थिक परिस्थिती समजून घ्या आणि किती वेळेत तुम्हांला तुमचे पैसे मिळतील हे कबुल करून घ्या. जर पैसे मिळण्याची शाश्वती असेल तरच पैसे उधार द्या.
तुमची ऐपत बघा: तुमच्या आर्थिक स्थिरतेला धोका न पोहोचवता तुम्हाला तुमच्या मित्राला किंवा नातेवाईकाला पैसे देणे परवडणारे आहे की नाही याची चाचपणी करा. आपली ऐपत असेल तरच उधारी द्या. 'दुसऱ्याच्या झेंड्यावर पंढरपूर' करण्याची आवश्यकता नाही हे लक्षात घ्या.
लेखी करार: पैशाचे व्यवहार करताना खूप जास्त खबरदारी घ्यायला हवी. नंतरून होणारे गैरसमज टाळण्यासाठी कर्जाची रक्कम, अटी, आणि परतफेडीचे वेळापत्रक यांची कल्पना देणारा एक लेखी करार करण्यास हरकत नाही. यासाठी कुणी साक्षीदार असेल तर अतिउत्तम!
म्हणजेच काय तर, मित्रांशी किंवा नातेवाईकांशी पैशांचे व्यवहार करताना खबरदारी बाळगा. एकाचवेळी नातेसंबंध जोपासणे आणि मदतीला धावून जाणे या दोन्ही गोष्टी करताना तुम्हांला तारेवरची कसरत करावी लागू शकते. स्वतःचे संभाव्य आर्थिक नुकसान टाळायचे असेल तर वर दिलेल्या मार्गांचा अवलंब तुम्ही करू शकता.