कॉर्पोरेट कंपन्या सहसा कर्माचाऱ्यांना आरोग्य विम्याची सुविधा देतात. मुले पत्नी, किंवा वडीलांनाही या विम्यात सहभागी करता येते. तुमचा जर दुसरा वैयक्तिक विमा नसेल तर काहीतरी आधार म्हणून हा विमा मदतीला येईल. मात्र, काही परिस्थितीमध्ये कॉर्पोरेट विमा कवच पुरेसे ठरत नाही, असे दिसून आले आहे.
कॉर्पोरेट विम्याचे काही चांगले फायदे देखील आहेत जे वैयक्तिक दुसऱ्या पॉलिसीमध्ये सुरुवातीपासून मिळत नाही. या लेखात कॉर्पोरेट विम्याचे फायदे आणि तोटे काय? कंपनीकडून विम्याची सुविधा मिळत असताना तुम्हाला दुसरी विमा पॉलिसी घेण्याची गरज आहे का?
कॉर्पोरेट विमा पॉलिसीतून मिळणारे फायदे?
पहिल्या दिवसापासून विम्याचा कव्हर मिळतो. तसेच पूर्वीपासून असलेले आजारही पहिल्या दिवसापासून कव्हर होतात.
पहिल्या दिवसापासून मॅटरनिटी खर्च जास्तीत जास्त दोन मुलांसाठी कव्हर केला जातो.
कॉर्पोरेट विमा थर्ड पार्टीद्वारे घेतलेला असतो त्यामुळे कॅशलेस क्लेम केला जातो.
एका वर्षात एकापेक्षा जास्त क्लेम सहज पास होऊ शकतात. मात्र, विमा मर्यादेपेक्षा जास्त नाही.
कॉर्पोरेट विमा पॉलिसीला असलेल्या मर्यादा?
विमा संरक्षणाची रक्कम, पॉलिसीतील सातत्य आणि वैयक्तिक गरजांनुसार मिळणारे फायदे कॉर्पोरेट पॉलिसीमध्ये मिळण्यावर मर्यादा येतात.
पॉलिसी बझारने केलेल्या अभ्यासातून, असे समोर आले आहे की, 74% कॉर्पोरेट विमा पॉलिसी 4 लाखांपेक्षा कमी रकमेच्या असतात. त्यामुळे मोठे आणि गंभीर आजार झाल्यास ही रक्कम अपुरी पडू शकते.
कॉर्पोरेट आरोग्य विमा पॉलिसी ही सर्वांसाठी एकसमान बनवलेली असते. त्यामुळे वैयक्तिक गरजांनुसार विमा कव्हर, ठराविक आजारांसाठी जास्त विमा, रुमचा प्रकार निवडता येत नाही.
तसेच पॉलिसी टॉप अप, विम्याची रक्कम पूर्ण वापरली गेल्यास पुन्हा कव्हर रिस्टोरेशन आणि ओपीडी खर्च कव्हर करण्याचा पर्याय सहसा मिळत नाही.
काही ठराविक आजारांसाठी सबलिमिट असते. म्हणजेच त्या आजारासाठी रुग्णालयात भरती झाल्यास एकूण विमा संरक्षणाच्या 50% पर्यंत बिल कव्हर केले जाते. एक तृतीयांश कॉर्पोरेट विमा पॉलिसीत सबलिमिट असल्याचे अभ्यासात समोर आले आहे.
वैयक्तिक विमा पॉलिसी गरजेची आहे का?
प्रत्येक कॉर्पोरेट कंपनी विमा पॉलिसी वेगवेगळी असू शकते. जर तुमच्या पॉलिसीला कव्हर, बेनिफिटमध्ये जास्त मर्यादा असतील तर तुम्ही स्वत:ची वेगळी विमा पॉलिसी घेऊ शकता. विवाहित असाल तर मुले,पत्नी अशी मिळून फॅमिली फ्लोटर पॉलिसी घेऊ शकतात. कॉर्पोरेट पॉलिसीच्या बरोबरीने वेगळी स्वत:ची वेगळी पॉलिसी असेल तर अतिरिक्त सुरक्षा मिळेल.