जागतिक शेअर बाजारातील उत्साहपूर्वक खरेदी-विक्रीच्या पार्श्वभूमीवर आज आठवड्याच्या पहिल्या दिवशी भारतीय शेअर बाजारातही चांगली सुरूवात झाल्याचे पाहावयास मिळाले. आज दिवसअखेर शेअर मार्केट बंद होताना सेन्सेक्स ( Sensex) 180 .22 अंकां तर निफ्टी (Nifty 50) 60 .15 अंकानी वधारला. बॅंक निफ्टीमध्ये (Bank Nifty) सुद्धा 476.25 अंकांची चांगली वाढ दिसून आली.
सेन्सेक्समध्ये 0.34 टक्क्यांची वाढ होऊन तो 52,973 .54 वर तर निफ्टीमध्ये 0.38 टक्क्यांची वाढ होऊन तो 15,842 .30 वर पोहोचला आहे. आणि बॅंकनिफ्टीमध्ये 1.44 टक्क्यांची वाढ होऊन तो 33,597.60 वर पोहोचला आहे. गेल्या आठवड्यात शेअर बाजारात खूपच पडझड झाली होती. वाढत्या महागाईचा आलेख, आरबीआयने वाढवलेला रेपो दर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील घडामोडींमुळे गेल्या आढवड्यात मार्केटमध्ये खूपच अनिश्चतता होती. पण आज शेअर मार्केट बंद होण्यापूर्वी त्यात सकारात्मक वाढ झाल्याची पाहावयास मिळाली.
आज दिवसभरात 2180 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ, तर 1138 शेअर्समध्ये घसरण झाल्याची पाहावयास मिळाली. 172 कंपन्यांच्या शेअर्सच्या किमतीत काहीच बदल झाला नाही. शेअर मार्केटमध्ये आज कॅपिटल गुड्स , ऑटो , ऊर्जा , रिअॅलिटी आणि सार्वजनिक बँकांच्या शेअर्समध्ये 1 ते 3 टक्क्यांची वाढ झाली. तर आयटी (IT) आणि एफएमसीजी (FMCG) सेक्टरमधील कंपन्यांच्या शेअर्समध्ये जोरदार विक्री झाली. आज आयकर मोटर्स (Eicher Motors), अपोलो हॉस्पिटल (Apollo Hospitals), एनटीपीसी (NTPC), युपीएल (UPL), एसबीआय (SBI) आणि बजाज फायनान्स (Bajaj Finance) या कंपन्यांच्या शेअर्समध्ये चांगली वाढ झाली. तर अल्ट्राटेक सिमेंट (UltraTech Cement), श्री सिमेंट (Shree Cement), एशियन पेंट्स (Asian Paints), आयटीसी (ITC) आणि ग्रासिम इंडस्ट्रिज (Grasim Industries) या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली.