अमेरिकेची केंद्रीय बँक फेडरल रिझर्व्हने तूर्त व्याजदर वाढ केली नसली तरी वर्षाअखेर दरवाढीचे संकेत दिल्याने जगभरातील शेअर मार्केटमध्ये पडझड सुरुच आहे. आज गुरुवारी 21 सप्टेंबर 2023 रोजी मुंबई आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचे निर्देशांक घसरले. सेन्सेक्स 550 अंकांनी घसरला असून निफ्टीत 150 अंकांची घसरण झाली.
भारतासह आशियातील प्रमुख शेअर बाजारात आज घसरण सुरुच आहे. फेडरल रिझर्व्हने वर्षअखेर एकदा व्याजदर वाढ करण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे बाजारातून परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी पैसे काढून घेण्याचा सपाटा लावला. बुधवारी एपआयआयने शेअर मार्केटमधून 3110.69 कोटी काढून घेतले. याचा फटका भारतीय बाजारांना बसला असल्याचे मेहता इक्विटीजचे वरिष्ठ शेअर बाजार विश्लेषक प्रशांत तापसे यांनी सांगितले.
आज सेन्सेक्स, निफ्टीमध्ये घसरण झाली. सेन्सेक्स मंचावरील 30 पैकी 9 शेअर तेजीत आहेत. यात महिंद्रा अॅंड महिंद्रा, टाटा मोटर्स, बजाज फायनान्स, टायटन, टेक महिंद्रा, अॅक्सिस बँक, एसबीआय, एशियन पेंट्स, भारती एअरटेल या शेअर्समध्ये वाढ झाली. इन्फीबीम, हॅथवे केबल, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बडोदा, पीएनबी बँक, आयडीबीआय बँक, कॅनरा बँक, युनियन बँक ऑफ इंडिया या शेअरमध्ये वाढ झाली.
सध्या मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 497 अंकांच्या घसरणीसह 66303.11 अंकांवर ट्रेड करत आहे. निफ्टी 134 अंकांनी घसरला असून तो 19768 अंकांवर ट्रेड करत आहे. रियल्टी इंडेक्स 4606 अंकांवर आहे. ऑईल अॅंड गॅस 19212.33 अंकांवर ट्रेड करत आहे. इन्फ्रा इंडेक्स 379.84 अंकांवर आणि एनर्जी इंडेक्स 8479.38 अंकांवर ट्रेड करत आहे.
आजच्या सत्रात ‘या’ शेअर्समध्ये घसरण
आजच्या सत्रात आयटी आणि बँकिंग क्षेत्रातील प्रमुख शेअर्समध्ये घसरण झाली. विप्रो, आयटीसी, इंड्सइंड बँक, एचयूएल, सन फार्मा, इन्फोसिस, जेएसडब्ल्यू स्टील, टीसीएस, बजाज फिनसर्व्ह, कोटक महिंद्रा बँक, अल्ट्राटेक सिमेंट, नेस्ले, टाट स्टील, एलअॅंडटी, एनटीपीसी, मारुती, पॉवरग्रीड, रिलायन्स इंडस्ट्रीज, आयसीआयसीआय बँक, एचसीएल टेक, एचडीएफसी बँक या शेअरमध्ये घसरण झाली.
गुंतवणूकदारांचे 2.32 लाख कोटींचे नुकसान
काल बुधवारच्या सत्रात सेन्सेक्समध्ये 796 अंकांची घसरण झाली होती. दिवसअखेर तो 662728 अंकांवर स्थरावला. काल निर्देशांकात 1% घसरण झाली. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 232 अंकांच्या घसरणीसह 19901 अंकांवर बंद झाला. कालच्या पडझडीत गुंतवणूकदारांचे 2.32 लाख कोटींचे नुकसान झाले. बीएसईमधील लिस्टेट कंपन्यांचे बाजार भांडवल 320.61 लाख कोटींपर्यंत खाली आले.