Jawan Box Office: पठाण चित्रपटानंतर शाहरुख खानने जवानच्या माध्यमातून पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये आलेली मरगळ पुसून टाकण्यासाठी कंबर कसली आहे. अवघ्या 13 दिवसांत जवानने 500 कोटींच्या क्लबमध्ये (500 Crore Club) एंट्री केली. 500 कोटींच्या क्लबमध्ये सामील होणारी ही शाहरुखची दुसरी फिल्म आहे.
शाहरुखने स्वत:चाच मोडला रेकॉर्ड
पठाण आणि गदर 2 च्या 500 कोटीच्या यशानंतर, शाहरुख खाने पुन्हा एकदा बॉलिवूडला कमीतकमी वेळेत 500 कोटींचा गल्ला पार करणारा चित्रपट दिला आहे. शाहरुखला पठाण चित्रपटासाठी 500 कोटीचा क्लब गाठण्यासाठी 22 दिवस लागले होते. यावेळी मात्र. शाहरुखने आपलाच रेकॉर्ड 9 दिवसांनी कमी करून मोडला आहे. जवानच्या या यशामुळे साऊथ इंडस्ट्रीमधील अॅटली या दिग्दर्शकाचे नावही अवघ्या 13 दिवसांत 500 कोटीच्या क्लबमध्ये सामील झाले.
जवान चित्रपट जन्माष्टमीच्या दिवशी रिलिज झाला होता. त्या आठवड्यात या चित्रपटाने चांगलीच गर्दी खेचली होती. त्या आठवड्यातील रविवारी सर्वाधिक कमाई केली होती आणि अवघ्या आठवड्यात 300 कोटीच्या क्लबमध्ये उडी मारली होती. त्यानंतर आता जवानने बॉलिवूडमधील सर्वात कमी वेळेत 500 कोटींच्या क्लबमध्ये इंट्री मारून वेगळी ओळख निर्माण केली. वेगळी ओळख म्हणण्याचे कारण अजूनही फास्टेस्ट 500 कोटींच्या क्लबमध्ये पहिल्या 3 क्रमांकावर साऊथमधील 3 चित्रपट आहे. त्यानंतर बॉलिवूडमधील 3 चित्रपटांचा नंबर लागतो.
बाहुबली 2 अजूनही नंबर एकवर
साऊथ इंडस्ट्रीमधील बाहुबली 2 हा चित्रपट अजूनही 500 Crore Club मध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. या चित्रपटाने अवघ्या आठवड्याभरात 500 कोटींचा क्लब गाठला होता. त्यानंतर RRR या चित्रपटाने 8 तर साऊथमधीलच KGF या चित्रपटानेही 8 दिवसात 500 कोटींचा क्लब गाठला होता. त्यानंतर बॉलिवूडच्या जवानने 13 दिवसात, पठाणने 22 दिवसात आणि गदर 2 ने 23 दिवसांत 500 कोटींचा क्लब गाठला आहे.
शाहरुखचे दोन चित्रपट 500 कोटी क्लबमध्ये
शाहरुख खान हा एकमेव कलाकार आहे; ज्याचे दोन चित्रपट 500 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाले आहेत. तर एस एस राजामौली या दिग्दर्शकाचे दोन चित्रपट 500 कोटींच्या क्लबमध्ये आहेत. जवानने अवघ्या 13 दिवसात भारतात 511.04 कोटींचा गल्ला मिळवला आहे.