एका बँक खात्यातून दुसऱ्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर (Transfer money) करणं हे अनेक लोकांसाठी खरं तर नित्याचं काम आहे. त्यात ऑनलाइन (Online) सुविधादेखील आता उपलब्ध आहे. त्यामुळे पैसे ट्रान्सफर करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. अशावेळी अनेकदा असंही होतं, की एखाद्याला पैसे पाठवताना चुकीचा बँक खाते क्रमांक किंवा इतर कोणतीही चुकीची माहिती देऊन पैसे दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर केले जातात. चुकून दुसऱ्या खात्यात पैसे ट्रान्सफर झाले तर अशावेळी काय करावं? तुम्हाला कोणत्या हालचाली कराव्या लागतील? एका ग्राहकानं अशा आशयाची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडियानं (State Bank of India) यासंबंधीची माहिती शेअर केली आहे.
Table of contents [Show]
ग्राहकाची ट्विटरवरून तक्रार
ग्राहकानं ट्विटरवर लिहिलं, "@TheOfficialSBI मी चुकून चुकीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर केले आहेत. हेल्पलाइनद्वारे दिलेली सर्व माहिती जवळच्या शाखेला दिली. मात्र, अद्यापपर्यंत शाखेकडून कोणतंही अपडेट दिलं गेलं नाही. कृपया मदत करा." ही तक्रार @RaviAgrawa68779 नावाच्या यूझर आयडीनं केली आहे.
होम ब्रान्च दुसऱ्या बँकेशी करेल संपर्क
ग्राहकाच्या या तक्रारीवर एसबीआयच्या अधिकृत ट्विटर खात्याकडून रिप्लाय आला आहे. तुम्ही चुकीच्या बँक खात्यात पैसे पाठवले असल्यास तुम्हाला काय पावलं उचलण्याची गरज आहे, हे एसबीआयच्या अधिकृत ट्विटर अकाउंटमध्ये सांगण्यात आलं आहे. बँकेनं पुढे म्हटलं, की जर चुकीचा बँक खाते क्रमांक टाकला गेला असेल तर होम ब्रांचशी संपर्क साधावा लागेल. यानंतर हो ब्रांच कोणत्याही शुल्काशिवाय इतर बँकेसोबत प्रक्रिया सुरू करेल.
ब्रांचमध्ये काम होत नसेल तर काय करावं?
संबंधित ब्रांचमध्ये प्रकरणाचा निपटारा होत नसेल तर ग्राहक https://crcf.sbi.co.in/ccfunder लिंकवर जाऊन तक्रार करू शकतात. तसंच कमेंट बॉक्समध्ये जाऊन संपूर्ण प्रकरणाचा उल्लेख करावा. नेमकं काय घडलं, या विषयी पूर्णपणे समजून घेतल्यानंतर टीम या प्रकरणाची चौकशी करेल.
पैसे ट्रान्सफर करण्यापूर्वी काय करावं?
पैसे ट्रान्सफर करण्यापूर्वी काय करायला पाहिजे, हे बँकेनं सांगितलं आहे. जर तुम्ही कोणत्याही प्रकारचे पेमेंट करणार असाल तर ते खातं आधी व्हेरिफाय करा करा. पडताळणी केल्यानंतरच पैसे पाठवावे. कोणत्याही चुकीच्या व्यवहाराला बँक जबाबदार नसल्याचंदेखील बँकेनं म्हटलं आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे यासंदर्भात काही नियम आहेत. या नियमानुसार, जर कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती दिली गेली आणि पैसे इतर कोणत्याही खात्यात गेले तर त्याची जबाबदारी केवळ ग्राहकाची असणार आहे.