मागील दोन सत्रात शेअर मार्केटमध्ये दबाव दिसून आला होता. वर्षअखेरीचा कालावधी असल्याने संस्थात्मक गुंतवणूकदार इअर एंडच्या मूडमध्ये आहेत. विशेषत: परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी गुंतवणूक काढून घेण्याचा सपाटा लावल्याने आज गुरुवारी 29 डिसेंबर 2022 सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये घसरण झाली. सकाळच्या सत्रात सेन्सेक्स 400 अंकांनी घसरला.
मुंबई शेअर बाजारात 30 पैकी 27 शेअरमध्ये घसरण झाली. वाहन उद्योग, बँका, ऑटो, आयटी कंपन्या या क्षेत्रात विक्रीचा जोर दिसून आला. सेन्सेक्स मंचावरील महिंद्रा, आयसीआयसीआय बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, नेस्ले, पॉवरग्रीड, टाटा मोटर्स, टाटा स्टील, इन्फोसिस, एचसीएल टेक, टायटन, एनटीपीसी, टेक महिंद्रा, एशियन पेंट्स, आयटीसी, एचडीएफसी, बजाज फिनसर्व्ह, एचयूएल, मारुती अशा महत्वाच्या शेअरमध्ये घसरण झाली. सन फार्मा, भारती एअरटेल आणि एसबीआय हे तीन शेअर किरकोळ वधारले आहेत.
आजच्या सत्रात एफएमसीजी क्षेत्रातील टाटा कन्झुमर, ब्रिटानिया इंडस्ट्रीज, वरुन बेव्हरेज, डाबर या शेअरमध्ये 1% ते 2% घसरण झाली. सरकारी कंपनी रेल विकास निगमचा शेअर आज दुसऱ्या दिवशी तेजीत आहे. रेल विकास निगमला मालदिवमधील 1500 कोटींचा प्रोजेक्ट मिळाला आहे. रेल विकास निगमचा शेअर 3.52% ने वधारला आणि तो 69.05 रुपयांवर गेला.
त्याशिवाय सुवेन लाईफसायन्स 5.44%, डाटा पॅटर्न्स 4.22% , जिंदाल सॉ 3.60%, क्रिसिल लिमिटेड 6.50% हे शेअर वधारले. आज जागतिक कमॉडिटी बाजारात क्रूडचा भाव 82.47 डॉलर इतका वाढला. त्यात 1% वाढ झाली. सध्या सेन्सेक्स 84 अंकांच्या घसरणीसह 60825 अंकावर ट्रेड करत आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 34 अंकांच्या घसरणीसह 18088 अंकांवर ट्रेड करत आहे.
कोव्हीडची चौथी लाट आल्याचे बोलले जाते. त्यामुळे जगभरातील गुंतवणूकदार सावध झाले आहेत. त्याचा परिणाम भारतीय बाजारांवर दिसल्याचे जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे मुख्य गुंतवणूक रणनितीकार व्ही. के विजयकुमार यांनी सांगितले. आशियातील सिंगापूर, टोकिया या शेअर बाजारात आज घसरण झाली.