मागील आठवड्यात दररोज उच्चांकी पातळी गाठणाऱ्या सेन्सेक्स आणि निफ्टीला नफावसुलीचा फटका बसला. आज मंगळवारी 6 डिसेंबर 2022 रोजी शेअर मार्केटमध्ये घसरण झाली. सकाळच्या सत्रात सेन्सेक्स 300 अंकांनी घसरला असून राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत 90 अंकांची घसरण झाली आहे.
मुंबईत रिझर्व्ह बँकेची पतधोरण समितीची बैठक सुरु आहे.महागाईचा स्तर पाहता यंदाच्या पतधोरणात बँकेकडून व्याजदर वाढीचा सपाटा कायम ठेवण्यात येईल, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे. जगभरात सध्या महागाईचा प्रश्न गंभीर बनला आहे. अमेरिकन अर्थव्यवस्था झपाट्याने सुधारत आहे. तेथील रोजगारांची ताजी आकडेवारी पाहिली तर अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह आगामी पतधोरण बैठकीत व्याजदर वाढण्याची दाट शक्यता आहे. या सगळ्या घटकांचे परिणाम आज शेअर मार्केटवर दिसून आले.
एनएसई मंचावर पीएनबी बँक, टाटा स्टील, येस बँक, बँक ऑफ बडोदा, युको बँक, आयडीएफसी बँक, वोडाफोन आयडिया या शेअरमध्ये मोठी ट्रेडिंग दिसून आली.युरोप आणि अमेरिकेतील मंदीचा फटका मार्केटमधील IT कंपन्यांना बसत आहे. आज एचसीएल टेक, झेंन्सर टेक्नॉलॉजी, एम्फासिस, एल अॅंड टी टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस या कंपन्यांच्या शेअरमध्ये घसरण 1 ते 2% घसरण झाली.
दुपारी 12.30 वाजता मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 322 अंकांच्या घसरणीसह 32511.34 अंकांवर ट्रेड करत आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 89.45 अंकांच्या घसरणीसह 18615.10 अंकांवर ट्रेड करत आहे. आजच्या सत्रात एनर्जी, ऑटो, रियल्टी, कॅपिटल गुड्स, ऑइल अॅंड गॅस, बँकेक्स, सीपीएसई, टेलिकॉम, टेक, आयटी, मेटल या क्षेत्रीय निर्देशांकात घसरण झाली आहे. पॉवर, इन्फ्रा या क्षेत्रात तेजी आहे.
शुगर इंडस्ट्रीमधील शेअर वधारले
गेल्या दोन सत्रात शुगर इंडस्ट्रीजमध्ये चांगली खरेदी दिसून आली आहे. आज मंगळवारी साखर उद्योगातील कंपन्यांचे शेअरमध्ये तेजीची लाट धडकली. देशातील साखर उत्पादन कमी झाल्याने यंदा सारखेचे भाव तेजीत राहण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर निर्यातीला देखील फटका बसू शकतो. आज प्रमुख साखर उत्पादक कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली. यात दालमिया भारत शुगर 2.37%,श्री रेणुका शुगर 3.87%, बजाज हिंदुस्थान शुगर 1.54%, बलरामपूर चिनी 0.04%, द्वारिकेश शुगर 0.70%, मगध शुरग 1.64% ने वधारले.
सोमवारी झाली होती घसरण
शेअर मार्केटमध्ये सोमवारी 5 डिसेंबर 2022 रोजी घसरण झाली होती. बाजार बंद होताना सेन्सेक्स 34 अंकांच्या घसरणीसह 62835 अंकांवर स्थिरावला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 18700 अंकांवर स्थिरावला होता.