आशियातील सकारात्मक संकेतांच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी खरेदीवर भर दिल्याने आज बुधवारी सकाळच्या सत्रात सेन्सेक्स आणि निफ्टीने सकारात्मक सुरुवात केली होती. बाजार सुरु होताच सेन्सेक्स 200 अंकांनी वधारला होता. मात्र ही तेजी फारकाळ टिकली नाही. दुपारच्या सत्रात सेन्सेक्स आणि निफ्टीत घसरण झाली आहे.
सध्या मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 347 अंकांच्या घसरणीसह 61354 अंकांवर ट्रेड करत आहे. इंट्रा डेमध्ये सेन्सेक्सने आज 500 अंकांची घसरण अनुभवली. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 100 अंकांनी घसरला आहे. तो सध्या 18285 अंकांवर व्यवहार करत आहे. मंगळवारच्या सत्रात सेन्सेक्सने 600 अंकांची डुबकी घेतली होती.
सेन्सेक्स मंचावर 30 पैकी 23 शेअरमध्ये घसरण झाली आहे. यात एशियन पेंट, एसबीआय, महिंद्रा अॅंड महिंद्रा, एलअॅंडटी, टायटन, कोटक बँक, एचडीएफसी बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, हिंदुस्थान युनिलिव्हर, टाटा स्टील, टाटा मोटर्स, बजाज फायनान्स, पॉवरग्रीड, एचडीएफसी, मारुती, आयटीसी या शेअरमध्ये घसरण झाली आहे. दुसऱ्या बाजुला सन फार्मा, एचसीएल टेक, नेस्ले, टेक महिंद्रा, इन्फोसिस, विप्रो हे शेअर वधारले.
निफ्टी मंचावर निफ्टी बँक, निफ्टी ऑटो, निफ्टी फायनान्शिअल सर्व्हिसेस, निफ्टी एफएमसीजी, निफ्टी आयटी, निफ्टी मिडिया, निफ्टी फार्मा, निफ्टी पीएसयू बँक या क्षेत्रीय निर्देशांकात घसरण झाली. आज ग्रेट इस्टर्न शिपिंग कंपनीच्या शेअरने 734.50 रुपयांचा 52 आठवड्यातील उच्चांकी स्तर गाठला. तसेच अदानी एंटप्राईसेस, महिंद्रा सीआयई आणि अपोलो टायर्स, आयआयएफएल फायनान्स हे शेअर 52 आठवड्यातील उच्चांकी स्तरावर आहेत.
‘एफएमसीजी’ शेअर्समध्ये मोठी घसरण
आज बाजारातील एफएमसीजी शेअर्समध्ये देखील मोठी घसरण झाली. गोदरेज कन्झुमर्स, ब्रिटानिया इंडस्ट्रीज, ज्योती लॅब, कोलगेट पामोलिव्ह, हॅटसन अॅग्रो, वरुण बेव्हरेजेस, मॅरिको, झायडस वेलनेस, बजाज कन्झुमर या कंपन्यांच्या शेअरमध्ये 0.50% ते 2.16% इतकी घसरण झाली.