Stock market Live: भारतीय शेअर मार्केटमधील बेंचमार्क निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये 1 टक्क्यांची घसरण झाली आहे. सेन्सेक्स 750 अंकांनी तर निफ्टीही 17400 अंकावर ट्रेडिंग करत आहे. शुक्रवारी (दि. 10 मार्च) मार्केट ओपन झाल्यापासूनच घसरणीचा ट्रेण्ड दिसून येत होता. यामध्ये प्रामुख्याने फायनान्स, आयटी, कॅपिटल गुड्स कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात विक्री झाली. जागतिक पातळीवर सुरू असलेल्या ट्रेण्डचाही परिणाम भारतीय शेअरमार्केटवर दिसून येत आहे.
निफ्टी निर्देशांकामधील 50 पैकी 46 शेअर्समध्ये घसरण दिसून आली आहे. तर तिकडे बीएसईमधील सर्व सेक्टरमध्ये विक्री सुरू आहे. बॅंकिंग, आयटी आणि मेटल या सेक्टरमध्ये मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याचे दिसून येत आहे. अदानी इंटरप्रायजेस, हिंडाल्को इंडस्ट्रीज, अदानी पोर्ट, बजाज फिनसर्व्ह आणि बजाज फायनान्स हे निफ्टीमधील सर्वाधिक घसरण झालेले, वाढलेल्या कंपन्यांमध्ये टाटा मोटर्स, ब्रिटानिया इंडस्ट्रीज, भारती एअरटेल आणि बजाज ऑटो या कंपन्यांचा समावेश आहे.
बॅंक निफ्टीमध्ये दीड टक्क्यांची घसरण
शेअर मार्केटमध्ये घसरणीचे सत्र सुरूच आहे. बॅंक निफ्टी (Bank Nifty)मध्ये 2 टक्क्यांनी घसरण झाली आहे. फायनान्शिअल व्यावसायाशी संबंधित कंपन्यांवरील दबाव वाढत आहे. त्याचा फटका शेअर मार्केटला बसत आहे. बॅंक निफ्टी 1.65 टक्क्यांनी घसरला असून जवळपास यामध्ये 683 अंकांची घसरण झाली आहे.
सध्या टाटा मोटर्सच्या शेअरमध्ये 1.11 टक्क्यांची वाढ असून सर्वाधिक फटका अदानी इंटरप्रायजेसला बसला आहे. अदानी इंटरप्रायजेसमध्ये 2.80 टक्क्यांची घसरण झाली आहे. एफएमजी सेक्टर चांगल्या स्थितीत असून पीएसयू बॅंकिंग सेक्टरला फटका बसला आहे.