Sensex at Peak: भारतीय भांडवली बाजाराची घोडदौड सुरूच आहे. आज (बुधवार) मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्स निर्देशांकाने नवा विक्रम केला. शेअर बाजाराच्या इतिहासात पहिल्यांदाच सेन्सेक्स निर्देशांकाने 66 हजार अंकांचा टप्पा ओलांडला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांकही 19,550 अंकावर ट्रेड करत आहे. अमेरिकेतील महागाई दर कमी झाल्याने जागतिक बाजारावर सकारात्मक परिणाम दिसून आला.
600 अंकांनी वाढ होऊन सेन्सेक्सने 66 हजार अंकांचा टप्पा ओलांडला. रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँक आणि आयटी कंपन्यांच्या शेअर्समध्ये आज तेजी दिसून येत आहे. या शेअर्सना सर्वाधिक मागणी असून त्यामुळे सेन्सक्सही ऐतिहासिक पातळीवर गेला. निफ्टी मेटल, ऑटो, एफएमसीजी, मीडिया, फार्मा आणि आरोग्य क्षेत्रातील कंपन्यांचे भावही वधारले आहेत.
अमेरिकेतील महागाई दर 2021 नंतर पहिल्यांदाच खाली
अमेरिकेमधील मंदीसदृश्य परिस्थिती आणि महागाईमुळे जगभरातील भांडवली बाजारावर नकारात्मक परिणाम झाला होता. मात्र, मार्च 2021 नंतर पहिल्यांदाच महागाईचा दर खाली आला आहे. नुकत्यात संपलेल्या जून महिन्यात फक्त 3% महागाई दर राहिला. त्याआधी मे महिन्यात हा दर 4% होता. जून महिन्यात महागाईचा दर जास्तच राहील, असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र, हा दर अंदाजापेक्षा कमी राहिल्याने सर्वांना सुखद धक्का बसला.
सेन्सेक्स निर्देशांकातील टाटा स्टील, टीसीएस, एचडीएफसी, M&M, SBI, बजाज फायनान्सचे शेअर्स आज वधारले. तर एचसीएल, नेस्ले, एशियन पेंट्स, पॉवर ग्रीड आणि एचयुएलचे शेअर्स खाली आले. ऑफर्स फॉर सेल द्वारे पंतजलीचे प्रमोटर्स 9% शेअर्सची विक्री करू शकतात, अशी घोषणा कंपनीने केल्यानंतर पतंजलीच्या शेअर्सला 5% लोअर सर्किट लागला.
उद्योग व्यवसाय तेजीत तर भाजीपाला दरवाढीने चिंता
दरम्यान, भारतातील ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) वाढून 4.81 टक्के झाला. कारण, भाजीपाला आणि दूधाचे दर वाढले आहेत. तर इंडियन इंडस्ट्रियल प्रॉडक्शन (IIP) दर मे महिन्यात 5.2 टक्के राहिला. निर्मिती क्षेत्र चांगल्या स्थितीत असल्याचे यातून दिसून आले. त्यामुळेही अर्थव्यवस्थेला गती मिळाली आणि भांडवली बाजार वर गेला.