Sensex Closing Bell: बुधवारी भारतीय शेअर बाजारामध्ये तेजी दिसून आली. आज दिवसभर सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांक हिरव्या रंगात राहिले. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 159 अंकांनी वाढून 17550 अंकांवर बंद झाला. तर मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स निर्देशांक 580 अंकांनी वाढून 59689 वर पोहचला. उद्या (गुरुवार) रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया पतधोरण जाहीर करणार आहे. त्या पार्श्वभूमीवर बाजारातील घडामोडींना वेग आला आहे. जागतिक स्तरावरील घडामोडींचा परिणाम भारतीय शेअर मार्केटवर झाला नसल्याचे दिसून आले. इतर आशियाई देशांतील बाजारांपेक्षा भारतीय बाजारात तेजी दिसून आली.
कोणत्या कंपन्यांच्या शेअर्सने दिवस गाजवला?
निफ्टी 50 मधील लार्सन अँड टुब्रो, एचडीएफसी, एचडीएफसी बँक, आयटीसी आणि हिंदुस्तान युनिलिव्हरच्या शेअर्स वधारले. तर आयशर मोटर्स, मंहिद्रा अँड महिंद्रा, इंडसंड बँक, एनटीपीसी आणि अदानी एंटरप्राइजेस कंपनीने खराब कामगिरी केली.
फायनान्स क्षेत्रातील शेअर्सला मागणी
बुधवारी भारतीय शेअर मार्केटमध्ये तेजी दिसून आली. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांक हिरव्या रंगात बंद झाले. निफ्टी 159 अंकांनी वाढून 17550 अंकांवर तर सेन्सेक्स 580 अंकांनी वाढून 59689 अंकांवर बंद झाला. दिवसभरात फायनान्स क्षेत्रातील शेअर्सला मोठी मागणी होती. कारण, बँका आणि आर्थिक संस्थानी मोठ्या प्रमाणात कर्ज वाटप केल्याचे जाहीर केल्यानंतर या शेअर्सवर गुंतवणुकदारांनी उड्या घेतल्या.
सेन्सेक्स चार दिवसांत 2000 अंकांनी वधारला
मागील सलग चार कामकाजाच्या दिवशी सेन्सेक्स 200 अंकांनी वधारला. त्यामुळे या चार दिवसांत गुंतवणुकदारांना 9.45 लाख कोटींचा फायदा झाला. तर मुंबई शेअर बाजारावरील कंपन्यांचे एकूण बाजार मूल्य वाढून 261 लाख कोटी झाले. जपानचे शेअर मार्केट आज 1.7 टक्क्यांनी खाली आले. तर अमेरिकेचा डाऊ जोन्स हा निर्देशांकही कमजोर राहीला.
एचडीएफसीचा शेअर 3 टक्क्यांनी वाढला
आज दिवसभरात फायनान्शिअल संस्थांच्या शेअर्सला मोठी मागणी होती. बँकांकडे जमा झालेल्या बचती आणि देण्यात आलेली कर्जे याचा सकारात्मक परिणाम शेअर मार्केटवर झाला. अर्थव्यवस्थेत वाढ होत असल्याचे हे लक्षण मानले जाते.
Q4 मधील कंपन्यांचे उत्पन्न
नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षातील चौथ्या तिमाहीत कॉर्पोरेट्स कंपन्यांचे उत्पन्न वाढेल, अशी आशाही व्यक्त केली जात आहे. टीसीएस, इन्फोसिस, एचडीएफसी आणि इतर मोठ्या कॉर्पोरेट कंपन्या जास्त नफा नोंदवली, अशी आशा गुंतवणुकदारांना आहे. पुढील आठवड्यात कंपन्यांकडून चौथ्या तिमाहीतील निकाल जाहीर करण्यास सुरुवात होईल.
परदेशी गुंतवणूकदार उत्सुक
मार्च महिन्यात परदेशी संस्थात्मक गुंतवणुकदारांनी 7,900 कोटी रुपये भारतीय शेअर बाजारात गुंतवले. तर सोमवारी एकाच दिवसात 322 कोटी रुपये पदेशातून भारतीय मार्केटमध्ये आले. याचाही सकारात्मक परिणाम आज शेअर बाजारावर झाला. परदेशी ब्रोकरेज संस्थानी भारतीय भांडवली बाजाराचा अभ्यास केला असून गुंतवणुकीस योग्य स्थिती असल्याचे म्हटले आहे. तसेच आज डॉलरच्या तुलनेत रुपया 0.41% सुधारला.