परदेशी गुंतवणूकदारांची प्रचंड गुंतवणूक, अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी पोषक वातावरण आणि सरकारच्या उपाययोजना यामुळे शेअर मार्केटमध्ये वर्ष 2023 तेजीचे ठरण्याची शक्यता आहे. नव्या वर्षात मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सची घोडदौड सुरुच राहणार असून तो डिसेंबर 2023 मध्ये 71600 अंकापर्यंत वाढेल, असा अंदाज आयसीआयसीआय सिक्युरिटीज या ब्रोकरेज संस्थेने व्यक्त केले आहे. पुढल्या वर्षात निफ्टी 21500 अंकांची पातळी ओलांडेल, असे भाकीत या संस्थेने वर्तवले आहे.
वर्ष 2022 मध्ये सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये प्रत्येकी 5% वाढ झाली होती. मात्र बीएसई स्मॉलकॅप इंडेक्स 3% ने घसरला होता. बीएसई मिडकॅप इंडेक्सने 1% ची किरकोळ वाढ नोंदवली. अमेरिका आणि युरोपातील मंदी, रशिया-युक्रेन युद्ध यामुळे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील शेअर्सला फटका बसला होता. शेअर मार्केटमध्ये जवळपास सर्वच आयटी कंपन्यांचे स्टॉक्स मागील वर्षभरात प्रचंड घसरले. ज्यामुळे गुंतवणूकदारांना मोठा आर्थिक फटका बसला. बीएसई आयटी इंडेक्स 24.10% ने घसरला. बीएसई कन्झुमर ड्युरेबल्स इंडेक्समध्ये 12% घसरण झाली होती. तसेच हेल्थेकअर निर्देशांक 11.80% ने घसरला होता.
या अहवालात सेन्सेक्सच्या वर्ष 2023 मधील कामगिरीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यानुसार पुढील वर्षभरात सेन्सेक्समध्ये 17% वाढ होण्याची क्षमता असल्याचे आयसीआयसीआय सिक्युरिटीजने म्हटले आहे. डिसेंबर 2023 अखेर सेन्सेक्स 71600 अंकांची पातळी गाठू शकतो. याच अहवालात निफ्टीसाठी 21500 अंकापर्यंत वाढेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. निफ्टीवरील प्रती शेअर उत्पन्न वर्ष 2023 मध्ये 785 रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. आर्थिक वर्ष 2021 मध्ये ते 515 रुपये होते.
गुंतवणूकदारांनी शुन्यापासून सुरुवात करण्याचा सल्ला
आयसीआयसीआय सिक्युरिटीज मात्र भारतीय शेअर मार्केटबाबत सकारात्मक आहे. गुंतवणूकदारांनी वर्ष 2023 ची शुन्यापासून सुरुवात करुन रणनिती ठरवावी असे अहवालात म्हटले आहे. ऊर्जा, वाहन उद्योग आणि बँकिंग क्षेत्रात तेजीची पुढची लाट धडकेल, असे आयसीआयसीआय सिक्युरिटीजने म्हटले आहे. गुंतवणूकदारांनी थिमनुसार गुंतवणूक स्ट्रॅटेजी ठरवणे हिताचे ठरेल, असा सल्ला या अहवालातून देण्यात आला आहे.
एफएमसीजी, रिटेल, हॉटेल्स, हॉस्पिटल्स, डिफेन्स, टेक्सटाईल, लॉजेस्टिक, टेलिकॉम या क्षेत्रात तेजीची शक्यता आहे. त्याशिवाय केंद्र सरकारकडून रेल्वे, संरक्षण, गृहनिर्माण आणि महामार्ग या क्षेत्रांसाठीची भांडवली तरतूद 18% ने वाढवण्याची शक्यता आहे, असे आयसीआयसीआय सिक्युरिटीजने म्हटले आहे.