शेअर मार्केटमध्ये आज सलग दुसऱ्या सत्रात तेजीचे वातावरण आहे. गुंतवणूकदारांनी खरेदीचा ओघ कायम ठेवल्याने आज बाजार सुरु होताच दोन्ही निर्देशांकांमध्ये वाढ झाली. आज मंगळवारी 27 डिसेंबर 2022 रोजी सेन्सेक्स 290 अंकांच्या वाढीसह 60861 अंकांच्या पातळीवर पोहोचला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 85 अंकांच्या वाढीसह 18100 अंकांवर गेला होता.
आजच्या सत्रात मेटल, टेलिकॉम, बँक, पॉवर, रियल्टी, इन्फ्रा, आयटी, ऑटो या क्षेत्रात खरेदीचा ओघ सुरु आहे. सेन्सेक्स मंचावरील 30 पैकी 29 शेअर तेजीत आहे. टाटा मोटर्स, पॉवरग्रीड, टाटा स्टील, इंड्सइंड बँक, एसबीआय, एचयूएल, आयटीसी, टीसीएस, रिलायन्स, एलअॅंडटी, आयसीआयसीआय बँक, टायटन, कोटक बँक, विप्रो, बजाज फायनान्स या शेअरमध्ये वाढ झाली.
बाजारात शुक्रवारी निफ्टीमध्ये 320 अंकांची घसरण झाली होती. त्यापैकी सोमवारी 207 अंकांची निफ्टीने भरपाई केली. चीनमध्ये कोरोनामुळे नवे संकट उभ राहिले आहे. वर्ष 2022 च्या अखेरीस कोरोना संकटाचा प्रभाव वाढेल ज्यामुळे शेअर मार्केटमध्ये अस्थिरता निर्माण होईल, असे मत जिओजित फायन्शिअल सर्व्हिसेसचे शेअर बाजार विश्लेषक डॉ. व्हि. के विजयकुमार यांनी व्यक्त केले. बँकांच्या शेअरमध्ये तेजीचा अंदाज त्यांनी यावेळी व्यक्त केला.
सकाळी तेजीने सुरुवात केली असली तरी सेन्सेक्समध्ये चढ उतार दिसून आले.इंट्रा डेमध्ये सेन्सेक्सने 300 अंकांची घसरण अनुभवली. सध्या सेन्सेक्स 60657 अंकांवर ट्रेड करत असून त्यात 75 अंकांची वाढ झाली आहे. निफ्टीमध्ये 35 अंकांची वाढ झाली असून तो 18051 अंकावर आहे.
माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात आज तेजी आहे. सोनाटा सॉफ्टवेअर, टाटा एलएक्सी, विप्रो, पर्सिस्टंट सिस्टम, एम्फासिस, टेक महिंद्रा, झेंसर टेक्नॉलॉजी, एचसीएल टेक या शेअरच्या किंमतीत वाढ झाली आहे.काल सोमवारच्या सत्रात सेन्सेक्समध्ये 721 अंकांची वाढ झाली होती. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 18000 अंकांच्या पातळीवर बंद झाला होता.
मेटल उद्योगातील शेअर्स वधारले
आजच्या सत्रात धातू क्षेत्राशी संबधित शेअर्समध्ये मोठी तेजी दिसून आली. मेटल उद्योगातील नाल्को, हिंदुस्थान कॉपर, हिंदाल्को, हिंदुस्थान झिंक, जिंदाल स्टील अॅंड पॉवर, सेल, वेल्सपन कॉर्प या कंपन्यांचे शेअर 2 ते 5% ने वधारला.