Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

KYC Update Fraud : केवायसी अपडेटच्या नावाखाली सायबर चोरांकडून होतेय वृद्धांची फसवणूक, कशी घ्याल काळजी?

KYC Update Fraud

ज्येष्ठ नागरिकांच्या डिजिटल अज्ञानाचा गैरफायदा सायबर चोर घेत असतात, त्यामुळे तुमच्या बँक खात्याचे डीटेल्स, पासवर्ड, ATM चा पिन क्रमांक किंवा ओटीपी कुणालाही देऊ नका.

गेल्या काही दिवसांपासून ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसते आहे. सायबर चोर आर्थिक फसवणुकीच्या नवनवीन क्लुप्त्या वापरताना दिसत आहेत. याचा सर्वाधिक फटका हा सिनियर सिटिझन्सला बसताना दिसतो आहे.

ठाण्यातील एका वयोवृद्ध नागरीकासोबत अशीच एक फसवणुकीची घटना घडली आहे. केवायसी अपडेटच्या नावाखाली ही फसवणूक झाली असल्याचे समजते आहे.

केवायसी अपडेटचा बहाणा 

सध्या सर्वच बँकांनी केवायसी अपडेट अनिवार्य केले आहे. बँक खातेदारांनी त्यांचा रहिवासी पत्त्याचा पुरावा, आधार कार्ड, PAN कार्ड, चालू असलेला मोबाईल क्रमांक बँकेत सादर करणे अनिवार्य आहे. पॅन केवायसी अपडेट करण्याच्या बहाण्याने या वृद्धाची तब्बल 6.45 लाखांची फसवणूक केली गेली आहे.

बँक कर्मचारी आहे असे भासवून सदर वृद्धाला सायबर चोरांनी संपर्क केला आणि त्यांचे केवायसी अपडेट बाकी असल्याचे सांगितले गेले. तुम्ही ते लवकरात लवकर पूर्ण न केल्यास तुमचे बँक खाते बंद केले जाईल आणि तुमचे बँकेत ठेवलेले पैसे बुडतील अशी भीती  त्या वृद्धाला दाखवली गेली.

बँकेचे तपशील मागवले 

आपले बँकेत ठेवलेले पैसे बुडतील या भीतीने सायबर चोरांनी मागितलेली संपूर्ण माहिती या वृद्धाने दिली. वृद्धाचे नाव, जन्मतारीख, पत्ता आदी माहिती त्यांनी घेतली आणि बँकेच्या मोबाईल ऍप्लिकेशनद्वारे त्याचा पॅन तपशील आणि जन्मतारीख अपडेट करण्याची सूचना केली. मोबाईलवर सायबर चोर वृद्धाला सूचना देत होते आणि सदर वृद्ध त्यांच्या सूचनांचे पालन करत होते.

सूचनांचे पालन करूनही वृद्धाचे केवायसी अपडेट पूर्ण होत नव्हते. बँकेचे सर्व्हर स्लो असल्यामुळे अपडेट पूर्ण होत नसल्याचे त्यांना सायबर चोरांनी सांगितले. थोड्यावेळाने पुन्हा कॉल करून तुम्हांला माहिती दिली जाईल असे सांगितले गेले.

6.45 लाख रुपयांचा लागला चुना 

सायबर चोराने फोन कट केल्यानंतर जेव्हा वृद्धाने त्यांच्या बँकेचे स्टेटमेंट बघितले तेव्हा त्यांना धक्काच बसला. सायबर चोरांनी त्यांचा बँक खात्यातून 28 वेळा व्यवहार केले होते. हे सगळे व्यवहार 24 हजार ते 25 हजारांच्या दरम्यान होते. या सगळ्या व्यवहारात तब्बल 6.45 लाख रुपये वृद्धाच्या बँक खात्यातून काढले गेले आहेत.

ज्या मोबाईल क्रमांकावर वृद्धाचे बोलणे झाले होते, त्यावर कॉल केला असता सदर मोबाईल स्वीच ऑफ दाखवण्यात येत आहे. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच वृद्धाने पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि सायबर गुन्हा नोंदवला आहे. याबाबत पोलीस पुढील तपास करत आहे.

कशी घ्याल काळजी?

केवायसी अपडेट करणे ही काही फार किचकट प्रक्रिया नाही. आधार कार्ड, पॅन कार्ड घेऊन तुम्ही तुमच्या नजीकच्या बँकेच्या शाखेत जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करू शकता. त्यामुळे मोबाईल कॉलवर कुणाही अनोळखी व्यक्तीला याबाबत माहिती देणे टाळले पाहिजे. ज्येष्ठ नागरिकांच्या डिजिटल अज्ञानाचा गैरफायदा सायबर चोर घेत असतात, त्यामुळे तुमच्या बँक खात्याचे डीटेल्स, पासवर्ड, ATM चा पिन क्रमांक किंवा ओटीपी कुणालाही देऊ नका.