चालू वर्षात भांडवली बाजारात अनेक चढउतार आले. महागाई वाढ आणि जागतिक घडामोडींमुळे अनेक कंपन्यांच्या शेअर्समध्ये अस्थिरता होती. मात्र, सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ बडोदाने गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला. संपूर्ण वर्षात बँकेच्या नफ्यात आणि एकूण संपत्तीत मोठी वाढ झाली. या एका वर्षात कंपनीचा शेअर्स 126 टक्क्यांनी वाढला. मोठा नफा कमावून बँकेने भांडवली बाजारात सर्वांना सुखद धक्का दिला. कंपनीने चालू वर्षात 3 हजार 313 कोटींचा नफा कमावला असून कंपनीचे एकूण मूल्य 95 हजार 851 कोटी झाले आहे.
वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच 4 जानेवारी 2022 ला बँक ऑफ बडोदा शेअर्सची किंमत 83 रुपये होती. ती वाढून आज 30 डिसेंबर 2022 रोजी 185.65 एवढी झाली आहे. या शेअर्सची 52 आठवड्यातील उच्चांकी किंमत 197 रुपये होती तर निच्चांकी 79 रुपये होती. बँक ऑफ बडोदाच्या प्रत्येक शेअर्समागे डिव्हिडंट इल्ड 1.54 टक्के आहे.
सोबतच मिड कॅप कॅटेगरीतील PSU युनियन बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ इंडिया प्रत्येकी 80% आणि 68% वाढ नोंदवली. पहिल्या पाच बँकांमध्ये या दोन्हींनी स्थान मिळवले. देशभरात ऊर्जेची अतिरिक्त गरज निर्माण झाली होती, त्यामुळे ऊर्जा क्षेत्रातील कोल इंडियाच्या शेअर्समध्येही गुंतवणूकदारांना नफा झाला.
लार्ज-कॅपमधील गौतम अदानी यांच्या अदानी एंटरप्रायझेस आणि अदानी टोटल गॅस पहिल्या पाचमध्ये होत्या, तर ITC आणि कोल इंडिया सुद्धा पुढे होत्या. अदानी उद्योग समुहाच्या कंपन्यांचे बाजारात नाव झाल्याने त्यांचा फायदा कंपन्यांच्या शेअर्सला झाला. जगभरात ऊर्जा क्षेत्राची मागणी वाढली असून किंमतीही वाढल्या. त्यामुळे अदानी पावरला याचा फायदा झाला.