सध्या आर्थिक साक्षरतेवर सर्वसामान्य नागरिक जोर देताना दिसत आहेत. अर्थकारण समजून घेण्यासाठी, गुंतवणुकीचे वेगवेगळे पर्याय जाणून घेण्यासाठी अनेकजण प्रयत्न करत असतात. सध्या सोशल मिडियाचा वापर देखील वाढला असल्यामुळे सामान्य नागरिक सोशल मिडियावर गुंतवणूकसंबंधी काही माहिती मिळते का? कुठल्या टिप्स मिळतात का? हे बघत असतात.
सामान्य नागरिकांचे अर्थविषयक अज्ञान लक्षात घेता त्यांना चुकीचा आणि फसवा सल्ला देणारे काही लोक सोशल मिडियावर सध्या सक्रीय आहेत. युट्युब, इन्स्टाग्राम, टेलीग्राम आदी सोशल मीडियावर हे व्यक्ती सामान्य नागरिकांना, गुंतवणूकदारांना आर्थिक सल्ला देत असतात. यांना फायनान्शियल इन्फ़्लुएन्सर (Financial Influencers) म्हणूनही ओळखले जाते.
हे फायनान्शियल इन्फ़्लुएन्सर स्वतःचे सोशल मिडिया चॅनेल नावारूपाला यावे, त्यातून त्यांची कमाई व्हावी म्हणून नागरिकांना झटपट श्रीमंत होण्याचे चुकीचे सल्ले देताना दिसतात. गुंतवणूक सल्लागार म्हणून कुठलेही अधिकृत शिक्षण, प्रशिक्षण नसतानाही हे फायनान्शियल इन्फ़्लुएन्सर सर्वसामान्यांना चुकीचा सल्ला देत आहेत. या सर्वांसाठी कठोर नियम आणण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.
सेबीची करडी नजर…
याबाबत सेबीने आता कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून फायनान्शियल इन्फ़्लुएन्सर संदर्भात काही नियमावली असावी अशी मागणी केली जात होती. विमा नियामक मंडळ, रिझर्व बँक ऑफ इंडिया आणि सेबीकडे अशा अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत आता SEBI लवकरच एक नियमावली जाहीर करणार आहे. याबाबतचे कामा अंतिम टप्प्यात आले असून येत्या काही दिवसांत ही नियमावली सार्वजनिक करण्यात येणार आहे. शेयर मार्केट, पर्सनल फायनान्स, म्युच्युअल फंड इत्यादींमध्ये सोशल किंवा डिजिटल माध्यमांद्वारे गुंतवणूक करण्याचा चुकीचा सल्ला देणाऱ्यांवर आता कारवाई केली जाणार आहे.
नोंदणी आवश्यक
फायनान्शियल इन्फ़्लुएन्सरचे चुकीचे आणि बेकायदेशीर महसूल कमावण्याचे मार्ग सामान्य गुंतवणूकदारांना अडचणीत आणणारे आहेत. ‘सेबी’कडे अधिकृत गुंतवणूक सल्लागार म्हणून नोंदणी असलेल्या फायनान्शियल इन्फ़्लुएन्सरलाच यापुढे आर्थिक सल्ला देता येणार आहे. त्यामुळे सेवा व उत्पादनांची जाहिरात करून घेताना कंपन्यांना सदर फायनान्शियल इन्फ़्लुएन्सर SEBI कडे नोंदणीकृत आहे की नाही हे तपासून घ्यावे लागणार आहे.
द्यावी लागेल स्वतःची माहिती!
जाहिरात किंवा सोशल मिडीयावर आर्थिक सल्लागार देणाऱ्या फायनान्शियल इन्फ़्लुएन्सरला त्यांच्या सोशल मिडीयावर स्वतःची माहिती देणे बंधनकारक असणार आहे. सेबीच्या म्हणण्यानुसार आता नोंदणीकृत फायनान्शियल इन्फ़्लुएन्सरला आता त्यांचा नोंदणी क्रमांक, संपर्क तपशील, गुंतवणूकदारांच्या तक्रारींसाठी हेल्पलाइन क्रमांक स्पष्टपणे नमूद करावा लागणार आहे.
 
     
     
                 
                                             
                                             
                                             
                                             
                                            