घरबसल्या पैसे कमावण्याच्या ऑफर्सबद्दल आजपर्यंत तुम्ही अनेक गोष्टी ऐकल्या असतील, पण आज आम्ही तुम्हाला शेअर बाजार नियामक सेबीने (SEBI) दिलेल्या एका खास ऑफरबद्दल माहिती देणार आहोत. या ऑफरमधून तुम्ही 20 लाख रुपयांपर्यंतची रक्कम घरबसल्या कमवू शकता. हे बक्षीस तुम्हाला दोन टप्प्यात दिले जाईल. मात्र यासाठी तुम्हाला सेबीची मदत करावी लागणार आहे. नेमकी काय आहे सेबीची ही ऑफर? आणि त्यासाठी काय करावं लागेल, जाणून घेऊयात.
'ही' आहे सेबीची ऑफर
शेअर बाजार नियामक सेबीने (SEBI) कर्ज बुडवणाऱ्या लोकांची म्हणजेच डिफॉल्टरची (Defaulter) एक यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये एकूण 515 लोकांची नावे समाविष्ट करण्यात आली आहेत. यामध्ये भारतातील टॉप 50 विलफुल डिफॉल्टर्सही समाविष्ट आहेत. ज्यांच्याकडे बँकांचे 92,570 कोटी रुपये अडकून पडले आहेत. याचा सरळ अर्थ असा आहे की, त्या लोकांनी कर्जाचे हप्ते जाणूनबूजून फेडलेले नाहीत.
तुम्हाला फक्त एवढंच करावं लागेल की, यापैकी कोणत्याही कर्ज बुडवणाऱ्या व्यक्तीच्या संपत्तीची माहिती सेबीला द्यावी लागणार आहे. ही माहिती देणाऱ्या व्यक्तीला डिफॉल्टरच्या संपत्तीच्या एकूण मूल्याच्या 2.5 टक्के किंवा 5 लाख रुपये रोख, यापैकी जी रक्कम कमी असेल, ती देण्यात येईल. त्यांनतर कर्जाची वसुली पूर्ण झाल्यानंतर एकूण थकबाकीच्या 10 टक्के किंवा 20 लाख रुपये, जी रक्कम कमी असेल, ती देण्यात येणार आहे.
यासाठी स्थापन केली विशेष समिती
शेअर बाजार नियामक सेबीने (SEBI) वसुली प्रक्रिये अंतर्गत डिफॉल्टर्सच्या मालमत्तेची ठोस माहिती देणाऱ्यांबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल आणि त्यांना सेबीकडून बक्षीसही दिले जाईल, असं सेबीने म्हटलं आहे.
या बक्षीसांच्या रक्कमेची शिफारस करण्यासाठी सेबीकडून एका समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीमध्ये परतावा विभागाचे मुख्य महाव्यवस्थापक आणि संबंधित वसुली अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय मुख्य महाव्यवस्थापकांनी सुचवलेला दुसरा वसुली अधिकारी आणि त्याच्या कार्यालयातील उपमहाव्यवस्थापक किंवा उच्च श्रेणीतील अधिकारी यांचा देखील या समितीमध्ये समावेश करण्यात आला आहे.