Rabi Crop: फेब्रुवारी महिन्यात देशातील अनेक भागांत सरासरीपेक्षा जास्त तापमान दिसून येत आहे. मार्च, एप्रिल, मे आणि जून या चार महिन्यात तर कडक उन्हाळा असू शकतो, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवला जात आहे. जर सरासरीपेक्षा जास्त उष्णता राहिली तर रब्बी हंगामातील गहू आणि इतर पिके धोक्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे कृषी उत्पन्न कमी होऊन भाववाढीची शक्यता वर्तवली जात आहे.
रब्बी पीक धोक्यात (Impact of Heat on Rabi crop)
स्कायमेट या हवामान अंदाज संस्थेने तीव्र उन्हाळ्याचा अंदाज वर्तवला आहे. उष्णतेच्या लाटेमुळे रब्बी पिकावर प्रामुख्याने गहू पिकावर परिणाम होण्याचाही अंदाज वर्तवला जात आहे. मागील वर्षी देशात गव्हाच्या किंमती चढ्या राहिल्या होत्या. सरकारी गोदामातील गहू विक्री करुन देशांतर्गत गव्हाची गरज भागवण्यात आली होती. यंदा रब्बी हंगामात जर कडक ऊन्हामुळे गव्हाचे उत्पादन रोडावले तर पुन्हा भाववाढ होण्याची भीती आहे.
तापमानाचा पारा 40 अंशावर (Temperature above 40 degree Celsius)
यंदा फेब्रुवारीच्या अखेरीस नाही, तर अगदी दुसऱ्या आठवड्यापासूनच राज्यात उष्मा जाणवू लागला. 16 फेब्रुवारीला तर हवामान विभागानं तापमानाविषयी इशाराही जाहीर केला होता. केवळ कच्छ आणि कोकणच नाही तर मध्य प्रदेश, राजस्थान आणि उत्तर भारतातील अनेक ठिकाणी नेहमीपेक्षा जास्त तापमान नोंदवलं गेलं आहे. काही ठिकाणी (heat wave India) पारा 40 अंशांजवळ गेला आहे. याचा परिणाम कृषी उत्पन्नावर होऊ शकतो.
कृषी उत्पन्न घटण्याची शक्यता (Agriculture production in rabbi season)
फक्त शेतीमालच नाही तर कृषीसंबंधीत इतरही कामांवर उन्हाळ्याचा (Heat impact on agri) परिणाम होईल. 3 ते 5 अंश सेल्सिअसने देशातील अनेक भागात जास्त तापमान आहे. कृषी क्षेत्राची वाढ सरासरी 4.6% प्रति वर्ष या वेगाने होत आहे. तीव्र उन्हामुळे कृषी क्षेत्राचे उत्पन्न घटल्यामुळे भाववाढ होण्याची दाट शक्यता आहे. सध्या गहू पीक वाढीच्या टप्प्यावर आहे. म्हणजेच गव्हाच्या ओंबीमध्ये दाणा भरण्याचा हा काळ आहे. कडक उन्हाचा परिणाम गव्हाच्या उत्पादनावर होऊ शकतो.
फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या गोदामामध्ये गव्हाचा साठाही कमी झाला आहे. 1 एप्रिलपर्यंत हा साठा 7.4 मेट्रिक टन इतका असू शकतो. 2017 पासूनचा हा सर्वात कमी साठा असेल. गव्हाची बाजारातील मागणी वाढली तर सरकारला गहू विकण्यापेक्षा शेतकरी खुल्या बाजारात गव्हाची विक्री करतील. त्यामुळे बाजारातील गव्हाच्या किंमतीही वाढतील.
एल-निनो इफेक्ट - (El Neno effect on Indian agriculture)
चालू वर्ष शेतीसाठी चांगले नसेल, अशी शक्यता एल-निनो या वातावरणीय परिस्थितीतूनही दिसून येत आहे. रब्बी हंगामाच्या शेवटी म्हणजे मार्च महिन्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याचा परिणाम शेती तसेच ग्रामीण भागातील उत्पन्नावर होऊ शकतो. एल निनोमुळे मान्सून पाऊसही पुरेसा होणार नसल्याचे अंदाज वर्तवले जात आहेत. कृषी उत्पन्न घटल्यास भाववाढीची शक्यता वर्तवली जात आहे.