Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

गृहकर्जाची व्याप्ती

गृहकर्जाची व्याप्ती

गृहकर्ज म्हणजे नक्की काय? गृहकर्जाची व्याप्ती किती?

साधारणपणे घरासाठी दिले जाणारे कर्ज म्हणजे गृहकर्ज होय, असा आपला सर्वसाधारण समज आहे. परंतु गृहकर्जाची परिभाषा एवढ्यापुरतीच मर्यादित नाही तर, घराशी संबंधित अन्य कामासाठी दिल्या जाणार्‍या कर्जालाही गृहकर्ज असेच म्हणतात. मग ती जमीन खरेदी असो किंवा घराची दुरुस्ती असो. त्यासाठी ग्राहकांना बँका गृहकर्ज उपलब्ध करून देत असतात. यावर पेंटहाऊस किंवा बंगला खरेदीसाठी गृहकर्ज मिळते, एवढाच मर्यादित विचार करतो. परंतु त्याहीपेक्षा पुढे जावून घराचे पुर्नबांधकाम करायचे असेल तरीही कर्ज मिळते. त्याचे प्रकार आपण पाहु या.

जमीन खरेदीसाठी कर्ज: घराबरोबरच जमीन खरेदीसाठीही अनेक बँका कर्ज देण्यास उत्सुक असतात. आजकाल जमीन खरेदी ही गुंतवणुक किंवा बंगला बांधण्यासाठी केली जाते. विशेषत: शहराबाहेर किंवा कोकण भागात जमीन खरेदीचे प्रमाण अधिक आहे. अशावेळी ग्राहकांना बँका आकर्षक व्याजदरात जमीनसाठी कर्ज देताना दिसून येतात. केवळ ती जमीन महानगरपालिका किंवा पालिका क्षेत्रात असावी असे काही बँकांचे बंधन असते. जर जमीनीचे एनए(N.A.) नसेल तर बँका सहजासहजी कर्ज देण्यास तयार नसतात. अशावेळी ग्राहक खासगी वित्तिय संस्था किंवा सहकारी बँकांचा पर्याय उपलब्ध असतो; पण त्यांचे व्याजदर चढे असतात. काही राष्ट्रीयकृत किंवा खासगी बँका मान्यताप्राप्त जमीनीसाठीची कर्ज देतात. हे कर्ज 85 टक्क्यांपर्यंत उपलब्ध करून दिले जाते. तरल व्याजदर आणि निश्चित व्याजदर या दोन्ही प्रकारात जमीनासाठी ग्राहकांना कर्ज मिळू शकते.

घर बांधकाम कर्ज: बहुतांशी नागरिक प्लॅट किंवा बंगला विकत घेण्याऐवजी स्वत:च्या मनपसंदीने घर बांधण्याचे नियोजन करतात. त्यासाठी देखील बँक कर्ज देतात. स्वत:च्या जमीनीवर मनाप्रमाणे घर बांधण्याची हौस अनेकांना असते. त्यासाठी पैशाची उपलब्धता बँकेकडून करता येते. एरवी प्लॅट किंवा घरखरेदीसाठी करण्यात येणारी गृहकर्जाची प्रक्रिया आणि घर बांधकामासाठीची कर्ज प्रक्रिया यात थोडाफार फरक येतो. प्रत्येक बँकांचे नियम आणि अटी वेगळे असून त्यानुसार आपल्याला कर्ज मिळू शकते. जागेचे एनए पत्र, महापालिकेकडून बांधकामाला मिळालेली मंजुरीचे पत्र, नाहरकत प्रमाण आदी कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर बँक आपल्या कर्ज देते.

घर विस्तारीकरण कर्ज: आपले घर मोठे आणि प्रशस्त असावे, असे कोणालाही वाटते. वाढते कुटुंब किंवा गरजा पाहून एखादा व्यक्ती घराचे विस्तारीकरण करण्याचे निश्चित करतो. प्लॅटमध्ये या बाबी शक्य नाहीत. परंतु स्वत:चा बंगला असेल तर मग गॅलरी वाढवायची असेल, वरचा मजला बांधायचा असेल, बाथरुम मोठे करायचे असेल, कंपाऊंड वॉल बांधकाम, आऊट हाऊस बांधायचे असेल अशा विविध कारणासाठी गृहकर्ज मिळू शकते. यासाठी परवानग्या असलेली कागदपत्रे बँकेत जमा करणे गरजेचे आहे. त्यानुसार ते कर्ज मंजुर झाल्यानंतर आपण घराचा आकार वाढवू शकतो किंवा कर्जाची रक्कमही वाढवू शकतो. जर आपण नियमितपणे कर्जफेड करत असाल तर बँक आपली परतफेडीची क्षमता पाहून पुरेसे कर्ज पुन्हा वाढवून देऊ शकतो. बँकेच्या अटी आणि शर्ती पूर्ण केल्यावरच बँका घर विस्तारासाठी कर्ज देते.

घरदुरुस्ती कर्ज : नवे कोरे घर खरेदी केले तरी दहा-वीस वर्षांनंतर घर दुरुस्ती करणे अनिवार्य ठरते. कारण वातावरणामुळे घराचा बाहेरील भाग बराचसा खराब झालेला असतो, वायरिंगही जुनी झालेली असते, पावसाळ्यात घर गळत असते. अशा स्थितीत घरदुरुस्ती करणे अनिवार्य असते. त्यासाठी सर्वांकडे पैसा असतोच असे नाही. त्यामुळे बँका अशा कामासाठीही गृहकर्ज उपलब्ध करून देते. घराची स्थिती आणि ग्राहकाची पत पाहून बँका विशिष्ट कामासाठी मुदतीत कर्ज उपलब्ध करून देते. या कर्जाच्या माध्यमातून आपण घराचा कायापालट करू शकतो आणि त्याचे आयुष्य आणखी वाढवू शकतो.