मुंबई विद्यापीठातील प्राध्यापकांना सध्या मनस्ताप सहन करावा लागतो आहे. याचं कारण म्हणजे काल दुपारी मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाच्या नावे काही प्राध्यापकांना एक मेल प्राप्त झाला आहे. या मेलमध्ये प्राध्यापकांकडून त्यांच्या बँक खात्याचे तपशील मागितले गेले आहेत. ज्या प्राध्यापकांनी तपशील दिले त्यांच्या खात्यातून पैसे वजा झाल्याच्या तक्रारी समोर येत आहेत.
काय आहे नेमके प्रकरण?
मुंबई विद्यापीठाचा परीक्षा विभाग हा परीक्षा घेणे, उत्तरपत्रिका तपासणे, प्रश्नपत्रिका बनवणे आदी कामात व्यस्त असतो. या सर्व कामात विद्यापीठाशी सलग्न असलेल्या प्राध्यापकांची नियुक्ती करण्यात येते. प्राध्यापकांना उत्तरपत्रिका तपासण्याचे पैसे देखील दिले जातात. नुकत्याच उन्हाळी परीक्षा होऊन गेल्या आहेत. यामध्ये अनेक प्राध्यापकांनी उत्तरपत्रिका तपासलेल्या आहेत. याचा मोबदला त्यांना अजूनही प्राप्त झालेला नाही.
अशातच परीक्षा विभागाच्या नावे प्राध्यापकांना [email protected] या मेल आयडीवरून एक मेल पाठवला गेला आहे. त्यात म्हटले आहे की, “तुमचे बँक तपशील आमच्याकडे उपलब्ध नाही, त्यामुळे आम्ही तुमचे मानधन देऊ शकत नाही. तेव्हा लवकरात लवकर तुमचे बँक तपशील, मोबाईल क्रमांक आणि संपूर्ण नाव शेयर करावे.”
ज्या प्राध्यापकांनी उत्तरपत्रिका तपासल्या होत्या त्यांना हा मेल खरेच विद्यापीठाकडून आला आहे असे वाटले आणि त्यांनी बँक खात्याची माहिती सदर मेलवर पाठवली. यांनतर प्राध्यापकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

बँक खाते झाले रिकामे!
ज्या प्राध्यापकांनी स्वतःची खाजगी माहिती शेयर केली होती, त्यापैकी काहींच्या बँक खात्यातून पैसे कापले गेल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. तसेच काही प्राध्यापकांचे जीमेल खाते देखील बंद पडले आहे. बँकेचे व्यवहार, बँक स्टेटमेंट या सगळ्यांचा तपशील प्राध्यापकांच्या ईमेलमध्ये आहे, त्यामुळे हा प्रकार समोर आल्यानंतर अनेकांनी बँकेत धाव घेतली असून याबाबत बँकांना कल्पना दिली आहे.
विद्यापीठाचा डेटा सायबर चोरांच्या हाती?
सायबर चोरांनी आता थेट मुंबई विद्यापीठाच्या डेटाची चोरी केली आहे. मुंबई विद्यापीठाशी सलग्न असलेल्या सर्व प्राध्यापकांची माहिती या सायबर चोरांकडून कुठून आली हा एक महत्वाचा प्रश्न आहे. मात्र प्राध्यापकांनी अशा कुठल्याही फेल इमेलवर विश्वास ठेऊ नये व आपली संवेदशील माहिती शेयर करू नये असे विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. मुळात ज्या नावे प्राध्यापकांना मेल आला आहे तो ई-मेल आयडी खासगी आहे. मुंबई विद्यापीठ खासगी ईमेलने कधीही व्यवहार करत नाही. त्यामुळे प्राध्यपकांनी देखील कुठलीही माहिती देताना या सर्व गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे.