देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या भारतीय स्टेट बँकेला 30 जून 2023 रोजी संपलेल्या पहिल्या तिमाहीत 16 हजार 884 कोटींचा नफा झाला. यंदा नफ्यात तब्बल 178.24% वाढ झाली. दरम्यान, एसबीआयच्या शेअरमध्ये मात्र घसरण झाली आहे. आज दुपारच्या सत्रात एसबीआयचा शेअर 3% घसरणी झाली होती. तो 572.80 रुपयांवर ट्रेड करत आहे.
बँकेला 15 हजार कोंटींचा नफा होईल असा अंदाज विश्लेषकांनी व्यक्त केला होता. मात्र त्यापेक्षा सरस कामगिरी बँकेने केली. एसबीआयने आज शुक्रवारी 4 ऑगस्ट 2023 रोजी पहिल्या तिमाहीची आकडेवारी जाहीर केली. त्यानुसार बँकेला एप्रिल ते जून या तिमाहीत 38 हजार 905 कोटी रुपयांचे नेट इंटरेस्ट इन्कम मिळाले.त्यात 24.7% वाढ झाली.
पहिल्या तिमाहीत बँकेचा अनुत्पादित कर्जांचा आकडा 91 हजार 327.84 कोटींपर्यंत खाली आला. गेल्या वर्षी याच तिमाहीत तो 1 लाख 13 हजार 271 कोटी 72 लाख इतका होता. पहिल्या तिमाही बुडीत कर्जांसाठी बँकेने 2501 कोटींची तरतूद केली.
बँकेचे भांडवल प्रमाण 14.56% इतके आहे. ईपीएस रेशो 18.92 रुपये आहे. जो तिमाही स्तरावर वाढला. आर्थिक वर्ष 2022 मधील चौथ्या तिमाही ईपीएस रेशो 18.71 रुपये इतका होता.
बँकेने पहिल्या तिमाहीत कर्ज वितरणात मोठी वृद्धी साधली. एकूण कर्ज वितरण 13.90% वाढले. त्याशिवाय वाहन कर्ज वितरणाने 1 लाख कोटींचा टप्पा ओलांडला. कृषि आणि कॉर्पोरेट कर्ज वितरणात अनुक्रमे 14.84% आणि 12.38% वाढ झाली.