SBI Chocolate reminder: ग्राहकांनी कर्जाचे हप्ते वेळेवर भरावे यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाने भन्नाट कल्पना शोधून काढली आहे. EMI ची आठवण करून देण्यासाठी बँक प्रतिनिधी थेट कर्जदाराच्या घरी चॉकलेट घेऊन येईल. गृह, वाहन, शैक्षणिक असे किरकोळ कर्ज घेणाऱ्या ग्राहकांनी कर्जाचे हप्ते थकवू नयेत हा उद्देश यामागे आहे.
नोटिशीऐवजी मिळेल चॉकलेट
बँक कर्ज थकवणाऱ्या ग्राहकांना सहसा नोटीस पाठवते किंवा फोन करून हप्ता भरण्याची आठवण करून देते. मात्र, स्टेट बँकेने या अडचणीवर अनोख्या पद्धतीने तोडगा काढण्याचे ठरवले आहे. ग्राहकांचं तोंड गोड करून EMI भरण्याची आठवण करून देण्यात येईल. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून जोखमीचे कर्जदार ओळखण्यात येईल. अशा ग्राहकांना EMI ची तारीख येण्यापूर्वीच घरपोच चॉकलेट मिळेल. हे काम करण्यासाठी स्टेट बँकेने दोन फिनटेक कंपन्यांची मदत घेतली आहे.
किरकोळ कर्जदारांमध्ये वाढ
मागील काही दिवसांपासून किरकोळ कर्जदारांची संख्या वाढत आहे. मात्र, त्यासोबतच हप्ता भरण्यात चालढकल, निष्काळजीपणाही दिसून येत आहे. तसेच व्याजदर वाढल्याने कर्जाचा हप्ताही वाढला आहे. अशा परिस्थितीत ग्राहकांनी वेळेवर EMI भरावा यासाठी बँकेचे प्रयत्न सुरू आहेत. बुडीत कर्जाचे प्रमाण वाढू नये यासाठी बँकेने ही अनोखी शक्कल लढवली आहे.
जोखमीचे कर्जदार कसे ओळखणार?
जोखमीचे कर्जदार म्हणजे असे ग्राहक जे कर्जाचा हप्ता चुकवण्याची शक्यता जास्त असते. हप्ते भरण्यातील दिरंगाई, अनियमितता याद्वारे जोखमीचे कर्जदार ओळखण्यात येतील.
यासाठी स्टेट बँकेने दोन फिनटेक कंपन्यांची मदत घेतली आहे. यातील एक कंपनी कोणते कर्जदार हप्ता थकवू शकतात त्यांची कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे माहिती जमा करेल. या ग्राहकांना बँक प्रतिनिधी घरपोच चॉकटेल देऊन कर्ज भरण्याची आठवण करून देईल. दुसरी फिनटेक कंपनी थकीत कर्जदारांसोबत मध्यस्थी करण्यासाठी स्टेट बँकेला मदत करेल.
बँकेने हा प्रकल्प प्रायोगिक तत्वावर सुरू केला असून यास यश मिळताना दिसत आहे. जर हा प्रयोग पूर्णपणे यशस्वी झाला तर देशभर राबवण्यात येईल.
स्टेट बँकेची किरकोळ कर्जाची आकडेवारी
स्टेट बँकेने 12 लाख कोटींपेक्षा जास्त रकमेचे कर्ज किरकोळ ग्राहकांना दिले आहे. वाहन, एज्युकेशन, गृह, वैयक्तिक अशा कर्जाचा यात समावेश आहे. एकूण कर्जापैकी गृह कर्ज 6 लाख कोटींपेक्षा जास्त आहे. तारण कर्ज देणारी स्टेट बँक ही देशातील मोठी कंपनी आहे.