बँकिंग क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या भारतीय स्टेट बँकेचे अध्यक्षपद म्हणजे एखाद्या मंत्रालयाचा मंत्रीपदा सारखेच आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात पसरलेल्या आणि विदेशातही भक्कम पाय रोवून उभी असलेल्या 'एसबीआय'च्या चेअरमनला बँकेकडून एक आलिशान बंगला, गाडी, नोकर-चाकर अशा सुविधा दिल्या जातात.
'एसबीआय'चे माजी अध्यक्ष रजनीश कुमार यांनी याबाबत ब्रुट या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत 'एसबीआय'च्या अध्यक्षांच्या मिळणाऱ्या वेतन आणि इतर सुविधांबाबत रंजक माहिती शेअर केली.
कुमार म्हणाले की एसबीआयच्या अध्यक्षाला दक्षिण मुंबईतील मलबार हिल परिसरात एक प्रशस्त बंगला मिळतो. हा जवळपास 2.5 एकरात पसरलेला आहे. या बंगल्याचे दर महिन्याचे भाडे किमान 2 ते 2.5 कोटी मिळेल इतका भव्य बंगला राहण्यास मिळतो. त्याशिवाय एक 30 ते 40 लाखांची गाडी अध्यक्षाला दिली जाते.
त्याशिवाय इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना ज्या ज्या सुविधा मिळतात. विमा सुविधा, नोकर-चाकर तशाच सुविधा चेअरमनला देखील मिळतात. एसबीआय अध्यक्षाला निवृत्तीनंतर दरमहा 1 लाख रुपयांचे पेन्शन मिळते.
दरम्यान, खासगी बँकांच्या तुलनेत किंवा कॉर्पोरेट क्षेत्राच्या तुलनेत सरकारी बँकेच्या अध्यक्षाला मिळणारे वेतन खूपच कमी असल्याबद्दल रजनीश कुमार यांनी नाराजी व्यक्त केली.
अध्यक्षपदी असताना अनेक सुविधा मिळतात. मात्र वेतन कमी असल्याने निवृत्तीवेळी फार मोठा निधी तयार होत नाही. रिटायरमेंटवेळी त्याला घर विकत घेताना अडचणी येतात. तुटपुंज्या पेन्शनचा फारसा परिणाम होत नाही, असे कुमार यांनी सांगितले.
'एसबीआय'ची बॅलन्स शीट 50 लाख कोटींची आहे. बँकेला वर्षाकाठी सरासरी 50 हजार कोटींचा नफा होतो. त्यातुलनेत चेअरमनला मिळणारे वेतन खूपच कमी असल्याचे त्यांनी सांगितले.
विद्यमान अध्यक्ष खारा यांना 37 लाखांचे पॅकेज
भारतीय स्टेट बँकेचे विद्यमान अध्यक्ष दिनेश खरा यांचे वर्ष 2022-23 मध्ये 37 लाख रुपयांचे वार्षिक पॅकेज होते. गेल्या वर्षाच्या तुलनेत त्यांच्या वेतनात सरासरी 7.5% वाढ झाली. खारा यांना 27 लाख रुपये मूळ वेतन असून महागाई भत्ता 9.99 लाख रुपये इतका आहे. खारा यांनी 1984 साली प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून खारा एसबीआयमध्ये रुजू झाले होते. ऑक्टोबर 2020 पासून ते बँकेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत आहेत. खारा यांचे वेतन त्यांच्या आधीचे चेअरमन रजनीश कुमार यांच्या तुलनेत 13.4% ने अधिक आहे.
खासगी बँकांच्या टॉप बॉसेसला गलेलठ्ठ पगार
सरकारी बँकांच्या तुलनेत खासगी बँकांच्या प्रमुखांना जास्त वेतन आहे. सरकारी बँकांच्या अध्यक्षांचे वेतन पॅकेज काही लाखांत आहेत तर खासगी बँकांचे सीईओ कोट्यवधींचे पॅकेज घेतात. यात एचडीएफसी बँकेचे सीईओ शशीधर जगदीशन यांना 2022-23 या आर्थिक वर्षात 10.55 कोटी रुपयांचे पॅकेज मिळाले. त्यांचेच सहकारी कैझाद भरूचा यांचे पॅकेज 10 कोटींच्या घरात आहे. अॅक्सिस बॅंकेचे सीईओ अमिताभ चौधरी यांना 9.75 कोटी रुपयांचे पॅकेज मिळाले आहे. आयसीआयसीआय बॅंकेचे सीईओ संदिप बक्षी यांना 9.60 कोटी रुपये वेतनापोटी मिळाले.