Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Sah Polymers IPO: साह पॉलिमर्सच्या समभाग खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीच पूर्ण सबस्क्राईब

Sah Polymers IPO

Sah Polymers IPO: साह पॉलिमर्सच्या समभाग विक्री योजनेला गुंतवणूकदारांनी जबदस्त प्रतिसाद दिला. शुक्रवारी कंपनीचा आयपीओ खुला झाला. पहिल्याच दिवशी 86% शेअर्ससाठी अर्ज प्राप्त झाल्याचे कंपनीने म्हटले आहे. या आयपीओसाठी 4 जानेवारीपर्यंत अर्ज करता येणार आहे.

साह पॉलिमर्सच्या IPO ला गुंतवणूकदारांनी जबदस्त प्रतिसाद दिला आहे. आज सोमवारी 2 जानेवारी 2023 रोजी कंपनीचा आयपीओ पूर्ण सबस्क्राईब ( (शेअर्सची मागणी पूर्ण) झाला आहे. साह पॉलिमर्स आयपीओमध्ये 66 कोटींचे शेअर्स इश्यू करणार आहे. शुक्रवारी 30 डिसेंबर 2022 रोजी कंपनीचा आयपीओ खुला झाला होता. गुंतवणूकदारांना 4 जानेवारी 2023 पर्यंत अर्ज करता येणार आहे.  

साह पॉलिमर्सच्या इश्यूला पहिल्याच दिवशी 86% शेअर्ससाठी अर्ज प्राप्त झाले होते. प्रारंभिक समभाग विक्री योजनेतून कंपनी एकूण 5610000 शेअर्स इश्यू करणार आहे. त्यापैकी राष्ट्रीय शेअर बाजाराच्या मंचावर (NSE) तब्बल 4804470 शेअर्ससाठी पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचे अर्ज प्राप्त झाल्याचे कंपनीने म्हटले आहे.

या योजनेत वैयक्तिक गुंतवणूकादारांसाठीचा राखीव हिस्सा 2.07 पटीने सबस्क्राईब झाला. बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठीचा राखीव हिस्सा पूर्ण भरला आहे. क्वालिफाईड इन्स्टीट्युशनल बायर्सचा हिस्सा 38% भरला आहे. आयपीओमधून उभारले जाणारे 66 कोटींचे भांडवल नवीन उत्पादन प्रकल्प सुरु करण्यासाठी वापरले जाणार आहे.  

साह पॉलिमर्सचा आयपीओ हा वर्ष 2022 मधील शेवटचा आयपीओ होता. आयपीओमधून कंपनी 66 कोटींचा निधी उभारणार आहे. कंपनी पॉलिप्रोपलिन, पॉलिथीन आणि कापडी बॅग्जची निर्मिती करते. मार्च 2022 अखेर कंपनीच्या नफ्यात 244% वाढ झाली होती. कंपनीला 4.4 कोटींचा नफा मिळाल होता. तर एकूण महसूल 80.5 कोटी रुपये इतका होता. कंपनीच्या एकूण व्यवसायात निर्यातीला 55% वाटा आहे.

दरम्यान, आयपीओला गुंतवणूकदारांचा जबरदस्त प्रतिसाद मिळत असल्याने साह पॉलिमर्सचा शेअर ग्रे मार्केटमध्ये वधारला आहे. साह पॉलिमर्सचा शेअरला ग्रे मार्केटमध्ये 5 रुपयांचा प्रिमीयम मिळत असल्याचे शेअर दलालांचे म्हणणे आहे. आयपीओमध्ये अर्ज करण्यासाठी आणखी दोन दिवस शिल्लक असल्याने ग्रे मार्केटमध्ये साह पॉलिमर्सचा शेअर वधारेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

साह पॉलिमर्ससाठी किमान किती गुंतलवणूक करावी लागेल

आयपीओसाठी कंपनीने प्रती शेअर 61 ते 65 रुपयांचा किंमतपट्टा निश्चित केला आहे. वैयक्तिक गुंतवणूकदारांना किमान 230 शेअर्सच्या एका लॉटसाठी अर्ज करता येईल. त्यानंतर त्या 230 च्या पटीत अर्ज करता येईल. साह पॉलिमर्ससाठी किमान गुंतवणूक 14950 रुपये इतकी असून जास्तीत जास्त 13 लॉटसाठी अर्ज करता येईल. त्याची एकूण गुंतवणूक रक्कम 194350 रुपये इतकी आहे.  साह पॉलिमर्सचा शेअर बीएसई आणि एनएसईवर लिस्ट होणार आहे.  

कधी होणार अलॉटमेंट आणि लिस्टिंग

साह पॉलिमर्सकडून 9 जानेवारी 2023 रोजी शेअर्सचे वाटप केले जाण्याची शक्यता आहे. 10 जानेवारी रोजी गुंतवणूकदारांच्या डिमॅट खात्यात शेअर्स जमा होतील. ज्यांना अलॉटमेंटमध्ये शेअर प्राप्त होणार नाहीत अशांना याच दिवशी रिफंड दिला जाईल. 12 जानेवारी 2023 रोजी साह पॉलिमर्सचा शेअर बीएसई आणि एनएसईवर लिस्ट होणार आहे.