रेल विकास निगम लिमिटेडचा (RNVL) शेअरमध्ये आज प्रचंड वाढ झाली आहे. आज गुरुवारी 2 मार्च 2023 रोजी इंट्रा डेमध्ये रेल विकास निगमचा शेअर 15.35% इतका वाढला. त्याने 67.50 रुपयांचा स्तर गाठला. आजच्या तेजीमागे रेल विकास निगमला वंदे भारत ट्रेनच्या निर्मिती आणि मेटनंन्सचे कंत्राट मिळाल्याचे बोलले जाते.
रेल विकास निगमचा मेट्रोवॅगनमाश या रशियन कंपनी संयुक्त उद्यम आहे. या दोन्ही कंपन्यांना 200 वंदे भारत ट्रेन्सची निर्मिती करण्याचे कंत्राट मिळाले आहे. वंदे भारत ट्रेन्सच्या निर्मिती आणि मेंटेनंन्सबाबतच्या निविदा आज जाहीर करण्यात आल्या. त्यात रेल विकास निगम लिमिटेडची निविदा सर्वात कमी किंमतीची ठरली. त्यानुसार सरकारने वंदे भारतचे कंत्राट रेल विकास निगमला बहाल केले आहे. प्रत्येक वंदे भारत ट्रेनसाठी 120 कोटी रुपयांचा करार करण्यात आला आहे.
या घडामोडीने आज शेअर मार्केटमध्ये रेल विकास निगमच्या शेअरमधील उलाढाल वाढल्याचे दिसून आले. बीएसईवर आज रेल विकास निगमचे 50.71 लाख शेअर्समध्ये ट्रेड झाला. दररोज होणाऱ्या सरासरी उलाढालीपेक्षा आज या शेअर्समध्ये पाच पटीने उलाढाल वाढली. एकूण 33 कोटींची आज उलाढाल झाली. या तेजीने रेल विकास निगमची मार्केट कॅप 13925.85 कोटी इतके वाढले आहे.
आजच्या तेजीने गुंतवणूकदारांनी जबरदस्त कमाई केली आहे. मागील वर्षभरात रेल विकास निगमचा शेअर मल्टीबॅगर ठरला आहे. रेल विकास निगमचा शेअर मागील वर्षभरात 115% ने वाढला आहे. सध्या हा शेअर 5 दिवस, 100 दिवस आणि 200 दिवसांच्या सरासरीपेक्षा वरच्या स्तरावर ट्रेड करत आहे. रेल विकास निगमचा आएसआय इंडेक्स 44.11 आहे. पीई रेशो 9.42 इतका आहे.
नफ्यात झाली होती मोठी वाढ
रेल विकास निगम लिमिटेडला 31 डिसेंबर 2023 रोजी संपलेल्या तिसऱ्या तिमाहीत 382.42 कोटींचा नफा झाला होता. या तिमाहीत रेल विकास निगमच्या नफ्यात 30.51% वाढ झाली होती. कंपनीला तिसऱ्या तिमाहीत 5012.09 कोटींचा महसूल मिळाला. डिसेंबर 2021 च्या तिमाहीच्या तुलनेत महसुलात किंचिंत घसरण झाली.
सरकारी कारखाना आधुनिक करण्याची जबाबदारी
भारतीय रेल्वे आणि रेल्वे मंत्रालयाअंतर्गत रेल विकास निगम ही कंपनी काम करते. रेल्वेसंदर्भातील विविध प्रकल्पांचे काम रेल विकास निगम घेते. यासाठी आवश्यक नियोजन आराखडा तयार करणे आणि व्यवस्थापनाची जबाबदारी रेल विकास निगम पूर्ण करते. रेल विकास निगम केवळ वंदे भारत ट्रेन्सची निर्मिती करणार नसून सरकारच्या मालकीचा प्रकल्प आणि ट्रेन डेपोला अद्ययावत करण्याची जबाबदारी देखील आहे. या संपूर्ण कंत्राटामध्ये रेल विकास निगम ही प्रमुख कंपनी असून आणखी दोन कंपनीसोबत रेल विकास निगमने संयुक्त उद्यम केला आहे. मेट्रोवॅगनमाश 70% आणि लोकोमोटिव्ह इलेक्ट्रॉनिक सिस्टम 5% आणि रेल विकास निगम 25% अशी या संयुक्त उद्यममध्ये भागीदारी आहे.