बाइक रायडिंगमध्ये सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या रॉयल एनफिल्ड बुलेट लवकरच ईलेक्ट्रिक प्रकारात दिसणार आहे. रॉयल एनफिल्ड बुलेटची निर्माती कंपनी आयशर मोटर्सने याबाबत अधिकृत घोषणा केली आहे. वर्ष 2025 मध्ये इलेक्ट्रिक बुलेट (Royal Enfield EV) प्रत्यक्षात भारतीय बाजारपेठेत दाखल होणार आहे.
गेल्या वर्षभरात ऑटो मार्केटमध्ये ईलेक्ट्रिक व्हेइकल्सने प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. दुचाकींमध्ये ओला इलेक्ट्रिक ही कंपनी आघाडीवर आहे. ओलाने ई-स्कुटरची बाजारपेठ काबीज केली आहे. त्यापाठोपाठ हिरो मोटोकॉर्प सारख्या कंपन्या ईलेक्ट्रिक बाईक आणण्याच्या तयारीत आहेत.
ईलेक्ट्रिक बाईकचा ट्रेंड ओळखून आयशर मोटर्सने देखील या श्रेणीत रॉयल एनफिल्ड बुलेटला सादर करण्याचा प्लॅन तयार केला आहे. 2025 मध्ये रॉयल एनफिल्ड पहिली इलेक्ट्रिक बुलेट लॉंच करेल, अशी माहिती आयशर मोटर्सचे व्यवस्थापकीय संचालक सिद्धार्थ लाल यांनी दिली.
ईलेक्ट्रिक बाइक मार्केटमध्ये येण्यास आम्हाला दोन वर्ष उशिर झाला आहे. मात्र आम्ही या मोटारसायकलची चाचणी घेत आहोत. ग्राहकांना सर्वोत्कृष्ट उत्पादन देण्याला आमचे प्राधान्य आहे, असे लाल यांनी सांगितले.
ईलेक्ट्रिक बुलेटबाबत आमची संकल्पना इतरांपेक्षा निश्चितच वेगळी आणि कल्पक आहे. त्यामुळे यातून एक वेगळेच नाविन्यपूर्ण मोटारसायकल तयार होईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. मात्र रॉयल एनफिल्ड इलेक्ट्रिक बुलेटची किंमत किती असेल, याबाबत कंपनीच्या वरिष्ठांकडून गोपनियता ठेवण्यात आली आहे.
कंपनीने इलेक्ट्रिक बुलेट प्रोजेक्टसाठी 100 तज्ज्ञांची खास टीम तयार केली आहे. नव्या उत्पादनांच्या संशोधनासाठी आयशर मोटर्सकडून 1000 कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे. इतकेच नव्हे तर इलेक्ट्रिक बुलेटसाठी कंपनीकडून स्वतंत्र निर्मिती करणारा प्रकल्प देखील सुरु केला जाणार आहे. याची उत्पादन क्षमता वर्षाकाठी 1.5 लाख इलेक्ट्रिक बुलेट्स इतकी असेल, असे लाल यांनी सांगितले.