गेल्या काही दिवसांपूर्वी रिजर्व बँक ऑफ इंडियाने 2000 रुपयांच्या चलनी नोटा व्यवहारातून काढून टाकणार असल्याचे जाहीर केले आहे. 30 सप्टेंबर पर्यंत बँकामध्ये या नोटा बदलता येणार आहेत किंवा खात्यात जमा करता येणार आहेत. परंतु अशातच 500 रुपयांच्या नकली नोटांमध्ये वाढ झाल्याचा अहवाल देखील आरबीआयने प्राकाशित केला आहे.
आरबीआयच्या अहवालानुसार 2021-22 च्या तुलनेत गेल्या आर्थिक वर्षात (2022-23) 20 आणि 500 रुपयांच्या (नवीन नोटा) किंमतीच्या बनावट नोटांमध्ये 8.4 टक्के आणि 14.4 टक्क्यांनी वाढ झाली आहे.सर्वाधिक 500 च्या बनावट नोटा चलनात असल्याचे या अहवालावरून स्पष्ट झाले आहे. आरबीआयकडे गेल्या वर्षात 500 रुपयांच्या 91110 बनावट नोटा जमा झाल्या आहेत.
2000 रुपयांच्या बनावट नोटांची संख्या पूर्वीच्या तुलनेत घट झाली असल्याचे देखील आरबीआयने स्पष्ट केले आहे. 2000 रुपयांच्या बनावट नोटांबाबत बोलायचे झाल्यास त्यात 27.9 टक्क्यांनी घट झाली आहे. परंतु या नोटा चलनातून मागे घेण्याचा निर्णय आरबीआयने घेतल्यामुळे याबाबत विशेष चिंता करण्याची गरज नाहीये. या नोटा बँकेत बदलण्यासाठी गेल्यावर किंवा बँक खात्यात जमा करायला गेल्यावर बँकेच्या निदर्शनास येणारच आहे. तसेच या नोटा चलनात नसल्यामुळे नागरिकांना आर्थिक तोटा सहन करावा लागणार नाहीये. मात्र 500 रुपयांच्या नव्या नोटा अजूनही चलनात असल्यामुळे नकली नोटांच्या बाबतीत सामान्य नागरिकांनी सजग राहणे आवश्यक आहे.
आरबीआयच्या रिपोर्टनुसार 10 आणि 100 रुपयांच्या मूल्यांच्या बनावट नोटांमध्ये अनुक्रमे 11.6 टक्के आणि 14.7 टक्क्यांनी घट झाली आहे.
बनावट 500 ची नोट कशी ओळखाल?
वॉटरमार्कचे निरीक्षण करा: 500 ची नोट खरी आहे किंवा नाही हे बघण्यासाठी ती प्रकाशासमोर धरा आणि महात्मा गांधींचा वॉटरमार्क असलेला फोटो त्यावर आहे की नाही हे शोधा, असली नोटांवर महात्मा गांधींच्या फोटोचा वॉटरमार्क आहे.जर वॉटरमार्क नसेल तर ती नोट नकली आहे असे समजा.
सिक्युरिटी थ्रेड तपासा: प्रत्येक 500 रुपयांच्या नोटेमध्ये एक सिक्युरिटी थ्रेड (चंदेरी रंगाची पट्टी) एम्बेड केलेला असतो. नोट थोडीशी तिरपी करून त्या सिक्युरिटी थ्रेडवर ‘भारत’ आणि RBI असे लिहिले असेल तर ती खरी नोट आहे असे समजा.
मायक्रोलेटरिंग बघा: असली नोटांवर महात्मा गांधींच्या चित्राजवळ नोटेच्या डाव्या बाजूला ‘RBI’ आणि ‘भारत’ (हिंदीमध्ये) चे मायक्रोलेटरिंग असते. हे मायक्रोलेटरिंग बारीक अक्षरात असते, बारकाईने हे बघितले तर ते तुम्हाला दिसू शकते. मायक्रोलेटरिंग असेल तर नोट खरी आहे असे समजावे.
इंटॅग्लिओ प्रिंट बघा: नोटेवरीलमहात्मा गांधी, RBI चा शिक्का आणि अशोक स्तंभाच्या चिन्हावर तुमची बोटे फिरवा. या भागात स्पर्शाने जाणवू शकणारे आणि जरासे उंचावलेले प्रिंट (इंटॅगलिओ) असेल. खरे तर अंध व्यक्तींना नोटा आणि त्याची किंमत ओळखता यावी यासाठी हे दिलेले असते. परंतु सदर नोट खरी आहे किंवा नाही हे तपासण्यासाठी देखील याचा वापर केला जातो.
तसेच बनावट नोटांवर अनेकदा अस्पष्ट लेखन केलेले असते आणि छपाईची गुणवत्ता देखील हलकी असते, त्यामुळे बघता क्षणी तुम्ही ती नोट खरी आहे किंवा नकली आहे याचा अंदाज लावू शकता.