Rice Price: जगभरात खाद्यपदार्थांच्या किंमती वाढत असतानाच आता तांदळाच्या किंमती आणखी वर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एल-निनो प्रभावामळे एशियन देशांतील तांदळाचे उत्पादन कमी होणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. तांदळाच्या किंमती मागील 11 वर्षाच्या उच्चांकावर आहेत. त्यात आणखी वाढ झाल्याने ग्राहकांच्या खिशाला झळ पोहचणार आहे.
भारतातून होणारी तांदळाची निर्यात
भारताचा जगभरातील तांदूळ निर्यातीतील वाटा 40% आहे. 2022 वर्षात भारताने 56 मिलियन टन तांदूळ निर्यात केला. मात्र, आता तांदळाचा साठा कमी झाला आहे. त्यात एल-निनोमुळे भात पिकाचे नुकसान होऊ शकते. तसेच उत्पादन घटल्याने निर्यातीवर आणि किंमतींवर परिणाम होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे. लहरी हवामान, रशिया-युक्रेन युद्ध यामुळेही कृषी मालाची दरवाढ झाली आहे.
भारत सर्वात स्वस्त निर्यातदार देश
भारत हा सर्वात स्वस्त दरात तांदूळ निर्यात करणारा देश आहे. मात्र, मागील काही वर्षांपासून खतांच्या किंमती आणि उत्पादन खर्च वाढत असल्याने तांदळाचे दरही वर जात आहेत. तसेच सरकारकडून किमान आधारभूत किंमतीतही वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे निर्यात होणाऱ्या तांदळाचे दरही वाढले आहेत.
300 अल्पउत्पन्न आणि गरिब देशातील नागरिकांच्या आहारात भात आहे. तसेच जगातील 90% तांदळाचे उत्पादन आशियाई देशांमध्ये घेतले जाते. यंदा एल-निनो या वातावरणीय प्रभावामुळे पाऊस कमी पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पाऊस कमी झाला तर कृषी उत्पादन मोठ्या प्रमाणात घटू शकते. कमी पावसाची स्थिती निर्माण होण्याआधीच जगभरातील तांदळाचे दर वाढले आहेत. त्यामुळे कमी पाऊस झाला तर किंमतींवर आणखी परिणाम होईल.
आशिया खंडातील प्रमुख तांदूळ उत्पादन देश
आशिया खंडात भारत, बांगलादेश, चीन, भारत, इंडोनेशिया, थायलंड आणि व्हिएतनाम या देशांमध्ये सर्वाधिक भात पिक घेतले जाते. एल-निनोचा प्रभाव या सहाही देशांवर होऊ शकतो. असे झाले तर जगभरातील तांदळाच्या किंमती गगनाला भिडतील.
मागील महिन्यात सरकारने तांदळाच्या किमान आधारभूत किंमतीत 7 टक्के वाढ केली. त्यानंतर भारतातून निर्यात होणाऱ्या तांदळाच्या किंमती 9 टक्क्यांनी वाढल्या आहेत. थायलंड आणि व्हिएतनाम देशातून निर्यात होणाऱ्या तांदळाच्या किंमतीही मागील दोन वर्षांपासून वाढल्या आहेत.