रिटायरमेंट म्हणजेच निवृत्तीनंतरच्या आयुष्याचे नियोजन करण्यास शहरात राहणाऱ्या नागरिकांचे प्राधान्य नाही, अशी चिंताजनक माहिती एका अहवालातून समोर आली आहे. मात्र, दुसरीकडे काम करत असताना केलेली बचत आपल्याला निवृत्तीनंतर पुरेल की नाही याची चिंता नागरिकांना आहे. तीन व्यक्तींपैकी फक्त एकच व्यक्ती निवृत्तीनंतरच्या काळासाठी आर्थिक नियोजन करत असल्याची माहिती मॅक्स लाइफ इन्शुरन्स विमा कंपनीने केलेल्या अहवालातून समोर आली आहे. कंतार या मार्केटिंग डेटा विश्लेषण कंपनीच्या सहकार्याने हा अहवाल तयार करण्यात आला आहे.
९० टक्के नागरिकांना होतोय पश्चाताप
शहरी भागात राहणाऱ्या नोकरदार व्यक्तींची माहिती यासाठी जमा करण्यात आली आहे. निवृत्तीनंतर कोणावरही अवलंबून न राहण्यासाठी नागरिकांनी केलेले आर्थिक नियोजन जाणून घेणे, हा मुख्य उद्देश सर्व्हेमागे ठेवण्यात आला होता. निवृत्तीनंतरचे आर्थिक नियोजन करण्यासाठी खुप आधीपासून बचत सुरू न केल्याचा पश्चाताप 50 वर्षांवरील 90 टक्के लोकांना होत असल्याचे वास्तव अहवालातून समोर आले.
२८ शहरांमधील ३ हजार २२० नोकरदार महिला आणि पुरुषांचा डिजिटल पद्धतीने सर्व्हे करण्यात आला. ६ मेट्रो शहरे, १२ टियर १ आणि १२ टियर २ शहरातील नागरिकांना सर्व्हेतून प्रश्न विचारण्यात आले. मागील काही वर्षांपासून भारतामध्ये सरासरी आयुष्यमान वाढत आहे. तसेच वयोवृद्ध नागरिकांचे प्रमाणही वाढत आहे. जर रिटायरमेंट नंतरचे आर्थिक नियोजन केले नाही तर दुसऱ्यावर अवलंबून राहण्याची वेळ येऊ शकते.
पुढील ८ वर्षात साठीपार नागरिकांची संख्या ४१ टक्के
भारताची लोकसंख्या खूप मोठी असून त्यातील निम्मी लोकसंख्या तरुण आहे. त्याचा देशाच्या विकासासाठीही फायदा होत आहे. कारण काम करणाऱ्या नागरिकांची संख्या जास्त असल्याने विकासदर वाढेल. मात्र, दुसरीकडे वयोवृद्धांची संख्याही वेगाने वाढत आहे. पुढील ८ ते ९ वर्षांमध्ये ४१ टक्के नागरिकांचे वय ६० वर्षांच्या पुढे जाईल. म्हणजेच ते निवृत्त होतील. त्यांचा देखभालीचा भार कुटुंबीयांवरती येईल. नोकरी करत नसताना आर्थिक नियोजन केले नाही तर आर्थिक स्वातंत्र्य अनुभवता येणार नाही. त्यामुळे तरुण वयापासूनच निवृत्तीचे नियोजन अत्यंत गरजेचे आहे.