सलग चार महिन्यांच्या घसरणीनंतर किरकोळ महागाई दरात पुन्हा वाढ नोंदवण्यात आली आहे. ग्राहक किंमत निर्देशांकावर (Consumer Price Index) आधारित किरकोळ महागाई जूनमध्ये 4.81 टक्क्यांवर पोहोचली आहे. किरकोळ महागाईचा थेट परिणाम सामान्य नागरिकांवर होत असल्यामुळे सध्या महागाईला तोंड देणे अवघड होऊन बसले आहे .
गेल्या महिन्यात मे महिन्यात किरकोळ महागाईचा दर 4.30 टक्के इतका नोंदवला गेला होता. त्यांनतर आता जून महिन्यात हाच दर 4.81 टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्या तीन महिन्यांचा विचार करता, जून महिन्यातील महागाईचा दर हा सर्वाधिक होता असे सांख्यिकी मंत्रालयाने जरी केलेल्या अहवालात म्हटले आहे. गेल्या वर्षी, याच महिन्यात किरकोळ महागाईचा दर 7% इतका नोंदवला गेला होता. दर महिन्याला मंत्रालयातर्फे किरकोळ आणि घाऊक महागाईचे निर्देशांक जाहीर केले जातात.
हवामानाचा परिणाम
नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस (NSO) च्या म्हणण्यानुसार, जूनमध्ये खाद्यपदार्थांच्या महागाईचा दर 4.49 टक्के होता, तर मे मध्ये 2.96 टक्के इतका होता. गेल्या काही महिन्यांपासून देशभरात हिरव्या पालेभाज्या, टोमॅटो, जिरे, कांदा, लसूण या रोजच्या आहारातील जिन्नसांच्या किमतीत कमालीची वाढ पहायला मिळते आहे. वर्षाच्या सुरुवातीला झालेला अवकाळी पाऊस, बिपरजॉय वादळ तसेच लांबलेला उन्हाळा या सर्वांचा परिणाम उत्पादनावर झाला असल्याने, किरकोळ बाजारात या वस्तू कमालीच्या महागल्या आहेत.
जूनमध्ये डाळींची महागाई 10.53 टक्के इतकी होती, तर मे महिन्यात ती 6.56 टक्के होती. पालेभाज्या आणि भाज्यांचा महागाई दर जूनमध्ये -0.93 टक्के होता, तर मे महिन्यात तो -8.18 टक्के होता, असे अहवालात म्हटले आहे.
मसाल्याचे पदार्थ महागले
नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस (NSO) च्या आकडेवारीनुसार जूनमध्ये मसाल्यांच्या महागाईचा दर 17.90 टक्क्यांवरून 19.19 टक्क्यांवर पोहोचला आहे. मसाल्याच्या पदार्थांचे देखील यावर्षी उत्पन्न घटले आहे. आवक कमी असल्यामुळे जिरे, तमालपत्र, काळी मिरी आदी वस्तूंचे भाव वाढले आहेत.
तेल, दुध आणि दुग्धजन्य पदार्थांचे भाव किरकोळ वाढले आहेत. किरकोळ महागाई दर 2 ते 6 टक्क्यांच्या मर्यादेत ठेवण्यासाठी रिझव्र्ह बँक प्रयत्नशील असते. या दरम्यान असलेली महागाई सामान्य नागरिकांना झेपणारी असते आणि भारतीय अर्थव्यवस्थेच्या नियंत्रणात असते असे मानले जाते.
 
     
     
                 
                                             
                                             
                                             
                                             
                                            