Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

RBI Penalty : नियमांचं दुर्लक्ष करणं पडलं या बँकांना महागात, RBI ने ठोठावला 'या' बँकांना दंड

RBI Imposes Monetary Penalty

Image Source : www.twitter.com/RBI

आरबीआयची मार्गदर्शक तत्व सर्व बँकांना लागू होतात. अशात काही बँका मात्र या मार्गदर्शक तत्वांकडे दुर्लक्ष करतात. मग अशा बँकांना आरबीआय दंड करतं. शरद पवारांचा गड समजल्या जाणाऱ्या बारामतीच्याही एका बँकेला आरबीआयने दंड ठोठावला आहे.

नियमांक़डे दुर्लक्ष करणं किती महागात पडू शकतं याची प्रचिती काही बँकांना नुकतीच आली आहे. या बँकांना आरबीआय अर्थात Reserve Bank Of India ने जबर दंड ठोठावला आहे. बँकांना घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचं या बँकांनी उल्लंघन केलं आहे असं आरबीआयचं म्हणणं आहे. महत्वाचं म्हणजे या बँकांमध्ये महाराष्ट्रातल्या बारामतीच्याही एका बँकेचा समावेश आहे.
आरबीआयने ज्या चार बँकांची नावं जारी केली आहेत त्या सहकारी तत्वावर चालणाऱ्या बँका आहेत. ज्या बँकांना आरबीआयने दंड ठोठावला आहे त्यात बारामती सहकारी बँक, वाघोडीया सहकारी बँक, वीरमगाम मर्केंटाईल सहकारी बँक आणि बेचराजी नागरी सहकारी बँक यांचा समावेश आहे.

कोणत्या बँकांना किती ठोठावला गेला दंड?

आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार बारामती सहकारी बँकेला दोन लाख रुपये, बेचराजी नागरिक सहकारी बँकेला ही दोन लाख रुपये इतका दंड ठोठावला गेला आहे. याशिवाय वाघोडीया सहकारी बँकेला पाच लाख रुपये तर वीरमगाम बँकेलाही पाच लाख रुपयांचा दंड ठोठावला गेला आहे.

हॅकर्सच्या जाळ्यातही सापडल्या होत्या बँक

सध्या हॅकर्सचं जाळं मोठ्या प्रमाणात पसरलेलं पाहायला मिळतं. हॅकर्स सर्वसामान्यांसोबतच आता बँकांनाही आपल्या जाळ्यात अ़डकवताना पाहायला मिळत आहेत. यामुळे बँकांचं मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत आहे. यासाठी आता आरबीआय पुढे सरसावली आहे. त्यासाठीही काही मार्गदर्शक तत्व आरबीआयने बँकांना घालून दिली आहेत. सायबर सिक्योरिटीच्या मार्गदर्शक तत्वांना न पाळल्याबद्दल एपी महेश सहकारी बँकेला आरबीआयने तब्बल ६५ लाख रुपयांचा दंड ठोठावला होता. हॅकर्सने या बँकेतनं थोडथोडके नव्हे तर १२.४८ कोटी रुपये लंपास केले होते.

या दंडाची रक्कम ग्राहकांच्या खात्यातून वळती होणार का?

आरबीआयने याबाबत खुलासा केला आहे. आरबीआयच्या म्हणण्यानुसार ज्या बँका नियमांकडे दुर्लक्ष करतात त्या बँका ठोठावलेल्या दंडाची भरपाई करण्यासाठी बांधील असतात. मात्र यात त्या बँकेच्या कोणत्याही ग्राहकांचा कसल्याही प्रकारचा काहीही संबंध नसतो. त्या बँकेत खातं असणाऱ्या किंवा त्या बँकेत खातं उघडणारे ग्राहक आणि त्यांच्या ठेवी पूर्णपणे सुरक्षित असतात. मात्र ठोठावलेल्या दंडाची रक्कम त्या बँकांना भरणं बंधनकारक असतं.