Unsecured Loan: कोरोनाची साथ आटोक्यात आल्यानंतर मागील एक वर्षापासून बाजारपेठा आणि अर्थव्यवस्था सुरळीत झाली आहे. मंदीच्या शक्यतेसोबतच काही राज्यात कोरोना डोके वर काढत आहे. मात्र, परिस्थिती हाताबाहेर गेलेली नाही. उद्योगव्यवसाय सुरळीत झाल्यानंतर बँकांनी व्यावसायिक आणि वैयक्तिक कर्ज देण्यास मोठ्या प्रमाणात सुरूवात केली आहे. त्यामुळे भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकांना कर्ज वाटपावरून इशारा दिला आहे.
भाववाढ आणि व्याजदर वाढत असताना असुरक्षित कर्ज वाटप करताना सावधगिरी बाळगण्याचा इशारा आरबीआयने वित्त संस्थांना दिला आहे. देशातील वित्त संस्थांनी उद्योगांना आणि वैयक्तिक कर्ज मोठ्या प्रमाणात वाटप केल्याचे समोर आल्यानंतर बँकांचे शेअर्स वरती गेले आहेत. मात्र, जर वाटप केलेले कर्ज फेडताना ग्राहकांना अडचणी आल्या तर बँक संकटात सापडू शकते. अमेरिका आणि युरोपातील बँका संकटात सापडल्याची घटना ताजी असताना भारतीय शिखर बँकेने वित्त संस्थांना सावधानतेचा इशारा दिला आहे.
क्रेडिट कार्ड आणि वैयक्तिक कर्ज
वित्त संस्थांकडून क्रेडिट कार्ड आणि वैयक्तिक कर्ज देण्यासाठी ग्राहकांना आकर्षित करण्यात येत आहे. विशेषत: कोरोनानंतर हे प्रमाण वाढले. मात्र, क्रेडिट कार्ड आणि वैयक्तिक कर्ज देताना बँकेकडून कर्जदाराची सखोल चौकशी होत नाही. कोणतेही तारण नसल्याने हे कर्ज असुरक्षित श्रेणीत मोडते. मात्र, बँकांवर या कर्जाचा बोजा वाढल्यास त्या अडचणीत येऊ शकतात.
क्रेडिट कार्डची आकडेवारी
चालू वर्षी जानेवारीपर्यंतची आकडेवारी पाहता भारतात क्रेडिट कार्डची आउटस्टँडिंग रक्कम 1.87 ट्रिलियन रुपये एवढी आहे. 2021 साली जानेवारी महिन्यात ही रक्कम 1.53 ट्रिलियन एवढी होती. ही आकडेवारी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जाहीर केली आहे. वैयक्तिक कर्ज किंवा क्रेडिट कार्ड ग्राहकांना देतानाची प्रक्रिया अधिक काटेकोर करण्याचे आदेश आरबीआयने बँकांना अलिखित स्वरुपात दिल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.
सिबिल आणि रिझर्व्ह बँकेकडील सप्टेंबर 2022 महिन्यापर्यंत उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार, सार्वजनिक बँकांनी दिलेले 4.3% टक्के आणि खासगी बँकांनी दिलेले 1.5% कर्ज बुडीत निघण्याच्या मार्गावर आहे. खासगी बँकांनी दिलेल्या अनुत्पादित कर्जाची टक्केवारी मागील वर्षी कमी होती. मात्र, आता त्यात वाढ होत आहे. भाववाढ कमी करण्यासाठी रिजर्व्ह बँकेने मागील एक वर्षात 250 बेसिस पॉइंटने रेपो रेट वाढवला आहे. त्यामुळे बँकांनीही सरासरी 95 बेसिस पॉइंटने व्याजदर वाढ केली आहे.