House Rent Hike: बंगळुरू शहराला भारताची सिलिकॉन व्हॅली म्हटले जाते. आयटी हब असण्याबरोबरच अनेक कंपन्यांची मुख्यालयेही बंगळुरुमध्ये आहे. सोबतच स्टार्टअप कंपन्याही शहरामध्ये मोठ्या प्रमाणात आहेत. कॉर्पोरेट्समध्ये काम करणाऱ्यांकडून घरांसाठी मोठी मागणी आहे. दरवाढीमध्ये बंगळुरू शहराने आर्थिक राजधानी मुंबईलाही मागे टाकले आहे. 2022 पासून आतापर्यंतचा विचार केल्यास बंगळुरुमधील घरांचे भाडे दुपटीने वाढले आहे.
बंगळुरू शहरात 15 लाखांपेक्षा जास्त कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणारे कर्मचारी आहेत. भारतातील विविध शहरांतून नोकरदार येथे येतात. शहरात भाड्याने घर घेऊन राहणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. सोबतच वाढत्या महागाईने घर मालकांनीही घरभाडे वाढवले आहे. गुगल, अल्फाबेट, गोल्डमॅन सॅच, अॅमेझॉन या कंपन्यांची कार्यालये बंगळुरू शहरात आहेत. दरम्यान, पुणे, मुंबई, दिल्ली, हैदराबाद आणि चेन्नई या प्रमुख शहरांमधीलही घरभाडे वाढले आहे. कोरोनाकाळात वर्क फ्रॉम होम मुळे मागणी कमी होती. मात्र, आता ही परिस्थिती बदलली आहे.
कोरोना काळात बुडालेला नफा मिळवण्याकडे घरमालकांचा कल
कोरोना काळात कर्मचाऱ्यांनी भाड्याचे फ्लॅट सोडून घरी प्रस्थान केले होते. त्यामुळे मालमत्ता मोकळ्या पडून होत्या. घर मालकांना भाडेकरूही मिळत नसे. तसेच घरांचे भाडेही कमी करावे लागले होते. हा तोटा भरून काढण्याचा प्रयत्न आता घरमालक करत आहेत. अनेक मोठ्या शहरांतील भाड्याचे दर वाढत आहेत. सोबतच नवे गृहप्रकल्प निर्मितीचा खर्च वाढल्याने सहाजिकच घरमालकही भाडेवाढ करत आहेत. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना भाड्यापोटी मोठी रक्कम द्यावी लागत आहे. याचा परिणाम बजेटवर होत असल्याचेही कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.
घरमालकांकडून लिंक्डइन प्रोफाइल आणि रिझ्युमेचीही मागणी
घरांचा तुटवडा पडू लागल्याने एजंट लोकांचेही फावले आहे. काही घरमालक भाडेकरूची सर्व माहिती घेऊनच घर देण्याचा निर्णय घेत आहेत. यातील काही एजंट आणि घरमालक भाडेकरुंची लिंक्डइन प्रोफाइल आणि रिझ्युमेची मागणी करत आहेत. अनेक जण घराच्या शोधात असून त्यांना घरच मिळत नसल्याचेही एजंटचे म्हणणे आहे. घर घेण्याआधी झूमद्वारे संभाव्य भाडेकरूची मुलाखतही सर्सास घेतली जात आहे. याचा कर्मचाऱ्यांना मनस्तापही होत आहे.
बंगळुरू शहरात घरभाड्यातून मालकांना सर्वाधिक म्हणजे 3.9% परतावा मिळत आहे. 2023 वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यात फक्त 13 हजार 560 नवे घरे बंगळुरुत उभी राहीली आहेत. मात्र, मागणी पुरवठ्यापेक्षा जास्त आहे. सेंट्रल बंगळुरू, व्हाईटफिल्ड आणि आउटर रिंग रोड भागात तर घर मिळणं सर्वाधिक बिकट होऊन बसलं आहे. या भागात दहा लाखांपेक्षा जास्त कर्मचारी काम करत आहेत.