आरोग्य विमा हा आपल्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका बजावतो, यात शंका नाही. कोरोना काळात हेल्थ इन्शूरन्सचा अनेकांना लाभ झाला आहे आणि याचे महत्त्वही सर्वांना पटले आहे. पण आरोग्यविमा घेतल्यानंतर त्याचे वेळेत नुतनीकरण करणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. तरच ती योजना पुढे सुरू राहते. यासाठी दरवर्षी पॉलिसीचे नुतनीकरण करावे लागते. हे नुतनीकरण करताना काही मुद्दे लक्षात घ्यावेत
विमा रकमेवर विचार: वाढत्या वैद्यकीय गरजेनुसार सध्याची विमा योजना ही भविष्यातही पुरेशी ठरू शकेल, असे नाही. त्यामुळे नुतनीकरण करताना विमा रकमेची मर्यादा वाढवण्याबाबत विचार करावा. तिशीच्या आतील असाल तर विमा कवच पाच लाखांपर्यंत असणे पुरेसे आहे. परंतु चाळीशीनंतर त्याची मर्यादा दहा लाखाच्या आसपास असणे गरजेचे आहे.
टॉप अप प्लॅन (Top up): इन्शुरन्स बेनिफिट वाढवण्यात टॉप अप विशेष भूमिका बजावते. आपल्याला सध्याची विमा योजना पुरेशी वाटत नसेल तर पॉलिसीचे नूतनीकरण करताना टॉप अप या पर्यायाचा निवड करू शकता.
नियम आणि अटी: कंपनीचे धोरण किंवा नियामक निकषातील काही बदलांमुळे विम्यांच्या अटीत आणि नियमांत वेळोवेळी बदल होत राहतो. पॉलिसीचे नूतनीकरण करताना विमा रक्कम, दावे आणि त्याची संख्या, नो क्लेम बोनस आदींची माहिती पुन्हा घ्यावी.
गरजांचा आढावा: आरोग्यविमा पॉलिसीचे नुतनीकरण करताना स्वत:चे आरोग्य आणि कुटुंबातील अन्य सदस्यांचे आरोग्य याचे आकलन करावे. नव्याने काही आजार कुटुंबातील सदस्यांना जडले असतील तर त्याची माहिती विमा कंपनीला द्यावी. आपण तशी सूचना न केल्यास कालांतराने दावा दाखल करताना अडचण येऊ शकते.
पोर्टेबिलिटीवर विचार करा: विमा कंपन्यांनीही आता मोबाईल, डीटूएच सेवांप्रमाणेच पोर्टेबिलिटीची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. यानुसार आपण आपली पॉलिसी एका कंपनीकडून दुसर्या कंपनीकडे ट्रान्स्फर करु शकतो. सध्याच्या विम्या कंपनीच्या सेवेबद्धल आपण समाधानी नसाल आणि दुसरी पॉलिसीची निवड करताना लाभ कमी होत नसेल तर पोर्टेबिलिटीच्या पर्यायाबाबतचा विचार करावा.
हेही लक्षात ठेवा
अनेक विमा कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी किंवा आपल्याकडेच कायम ठेवण्यासाठी मुदत संपण्यापूर्वी काही दिवस नुतनीकरण केल्यास अतिरिक्त लाभ देऊ करतात. याबाबतची माहिती घ्या. आरोग्यविमा पॉलिसीमध्ये विमाधारकांना सुरुवातीच्या 2 वर्षांनंतर, 4 वर्षांनंतर आधीपासून असलेल्या आजारांना कवच दिले जाते. पण नुतनीकरणास उशिर झाल्यास तुम्हाला पुन्हा नव्याने पॉलिसी घ्यावी लागत असल्याने नवीन ग्राहक म्हणून तुमची गणना होते. परिणामी, पुन्हा तुम्हाला जुन्या आजारांवरील उपचारांसाठी 2 किंवा 4 वर्षे थांबावे लागू शकते.