नव्या वर्षात जर तुम्ही रेफ्रिजरेटर घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागू शकतात. 5 टक्क्यांपर्यंत किमती वाढू शकतात, असे फ्रिज उत्पादक कंपन्यांचा अंदाज आहे. ब्युरो ऑफ इनर्जी इफिशिअन्सीने (BEE) नव्या वर्षात ऊर्जेच्या वापराविषयी नवे नियम लागू केले आहेत. या नियमांची पूर्तता करण्यासाठी कंपन्यांना अधिकचा खर्च येण्याची शक्यता आहे. १ जानेवारीपासून हे नवे नियम लागू झाले आहेत.
गोदरेज, हायर, पॅनासॉनिक या रेफ्रिजरेटर उत्पादक कंपन्यांच्या म्हणण्यानुसार २ ते ५ टक्क्यांपर्यंत किमती वाढतील. रेफ्रिजरेटरमधील अती थंड ठेवणारा कप्पा म्हणजे फ्रिजरला सुद्धा किती ऊर्जा खर्च होते, याचे वेगळे लेबल कंपन्यांना लावावे लागणार आहे. एकूणच फ्रिजला किती ऊर्जा लागते यासाठीही एक वेगळे लेबल असेल. 'ऊर्जा वापराबाबतचे नियम कठोर केल्यामुळे वस्तूची किंमतीही वाढते. इन्सुलेशन टिकवून ठेवण्यासाठी अधिकचा खर्च येऊ शकतो, असे गोदरेज अप्लायन्स उद्योगाचे व्हाइस प्रेसिडेंट कमल नंदी यांनी म्हटले.
फ्रिजमधील साठवण क्षमेतच्या ग्रॉस कॅपॅसिटिसोबतच नेट कॅपॅसिटीही आता द्यावी लागणार आहे. नेट कॅपॅसिटीद्वारे फ्रिजमधील किती जागा वापरण्याजोगी आहे ते अचूक कळेल, ग्रॉस कॅपॅसिटीमधून हे कळून येत नव्हते. आता नेट स्टोरेज कॅपॅसिटीमुळे ग्राहकांना फ्रिजची साठवण क्षमता किती आहे, हे समजण्यास सोपे जाईल. फ्रिजमध्ये वापण्यात येणाऱ्या कॉम्प्रेसरमध्येही काही बदल करावे लागू शकतात, असे हायर अप्लायन्सेस कंपनीचे प्रमुख सतिश एन यांनी म्हटले आहे.
BBE चे एनर्जी स्टार म्हणजे काय?
रेफ्रिजरेटरला थंड ठेवण्यासाठी किती ऊर्जा लागते, हे समजण्यासाठी ब्युरो ऑफ एनर्जी एफिशिअन्सीने स्टार सिस्टिम अनेक वर्षांपूर्वी वीजेवर चालणाऱ्या उपकरणांसाठी आणली आहे. एकूण पाच स्टार देण्यात आले आहेत. जेवढे जास्त स्टार उपकरणाला असतील तेवढी कमी ऊर्जा उपकरणाला लागते. कमी स्टार असणारे उपकरणांना जास्त ऊर्जा लागते. आता नव्या नियमानुसार फ्रिजरचा कप्पा थंड ठेवण्यासाठी किती ऊर्जा लागते, यासाठी आणखी एक लेबल लावण्यात येईल.