Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Recession in Europe: युरोपात मंदीची धडक, सलग दुसऱ्या तिमाहीत जर्मनीचा विकासदर घसरला

Recession in Europe: युरोपात मंदीची धडक, सलग दुसऱ्या तिमाहीत जर्मनीचा विकासदर घसरला

Recession in Europe: वाढती महागाई आणि बेरोजगारीने बेजार झालेल्या युरोपात अखेर मंदीने धडक दिली आहे. युरोपातील विकसित देश जर्मनीचा विकासदर सलग दुसऱ्या तिमाहीत घसरला आहे. मंदीच्या गर्तेत अडकणारा जर्मनी हा युरोपातील पहिला देश ठरला आहे.

वाढती महागाई आणि बेरोजगारीने बेजार झालेल्या युरोपात अखेर मंदीने धडक दिली आहे. युरोपातील विकसित देश जर्मनीचा विकासदर सलग दुसऱ्या तिमाहीत घसरला आहे. मंदीच्या गर्तेत अडकणारा जर्मनी हा युरोपातील पहिला देश ठरला आहे.

गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात रशिया आणि युक्रेन या देशात युद्ध सुरु झाल्यापासून युरोपात वस्तूंचा पुरवठा विस्कळीत झाला होता. त्यापूर्वी कोरोना महामारीत दोन वर्ष टाळेबंदीमुळे युरोपातील अनेक देशांची आर्थिक स्थिती बिकट झाली होती.युरोपातील अनेक देशांना महाग इंधन खरेदी करावे लागले होते.

मंदीची पहिली शिकार जर्मनी ठरली आहे. वर्ष 2023 मधील पहिल्या तिमाहीत जर्मनीचा विकासदर उणे 0.3% इतका घसरला आहे. यापूर्वी वर्ष 2022 मधील शेवटच्या तिमाहीत देखील जर्मनीचा विकासदर उणे 0.5% इतका होता. सलग दोन तिमाहीत विकासदर घसरल्याने मंदीचा विळखा घट्ट झाल्याचे बोलले जात आहे.

जर्मनीतील मंदीमागे रशिया आणि युक्रेन युद्धाचे मुख्य कारण आहे. या युद्धाने युरोपचा इंधन पुरवठा खंडीत झाला होता. जर्मनीसह अनेक देशांना इंधन संकटाचा सामना करावा लागला. देशांतर्गत इंधन, विजेचे दर गगनाला भिडले होते. यामुळे महागाईचा आगडोंब उसळला होता.

महागाईमुळे जर्मनीतील घरगुती मागणीत प्रचंड घसरण झाली आहे.तिमाही स्तरावर घरगुती वस्तूंच्या मागणीत 1.2% घसरण झाली. त्याशिवाय सरकारला देखील कल्याणकारी योजनांच्या खर्चाला कात्री लावावी लागली.

दरम्यान, जर्मनीच्या फेडरल स्टॅटस्टिक्स एजन्सीने उणे विकासदराची सुधारित आकडेवारी जाहीर केली आहे. यापूर्वी हा आकडा शून्य इतका ठेवण्यात आला होता. मात्र सलग दोन तिमाहीत विकासदर उणेच राहिल्याने अर्थचक्र मंदीच्या फेऱ्यात अडकल्याचे स्पष्ट झाले आहे.

विकासदर उणे असला तरी जर्मनीतील गुंतवणुकीमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले आहे. वर्ष 2023 मधील पहिल्या तिमाहीत गुंतवणूक वाढली. वर्ष 2022 मधील दुसऱ्या सहामाहीत गुंतवणुकीचा ओघ कमी झाला होता. व्यापार वाढत असल्याने त्याचे सकारात्मक परिणाम गुंतवणुकीवर दिसून आले.

यापूर्वी कोरोना टाळेबंदीच्या काळात जर्मनीने तात्पुरती मंदी अनुभवली होती. आताही सौम्य हिवाळा असल्यास आणि पुरवठ्यातील अडथळे दूर झाले तर जर्मनी मंदीतून बाहेर पडेल, असा विश्वास आयएनजी बँकेचे अधिकारी कार्स्टन ब्रेन्झस्की यांनी एएफपी या वृत्तसंस्थेशी बोलताना व्यक्त केला.