रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकांच्या कारभारात अधिक सुसूत्रीपणा आणि पारदर्शीपणा आणण्यासाठी नवे नियम प्रस्तावित केले आहेत. नव्या नियमांनुसार थकीत कर्जदारांनाही दिलासा मिळणार आहे. थकीत कर्जदारांना वसुलीसाठी उठसूट कधीही फोन करता येणार नाही. आरबीआयने नवे नियम प्रस्तावित केले असून मंजूरी मिळाल्यास लागू होतील.
काय आहे नवे नियम?
कर्ज वसुली एजंट थकीत कर्जदारास सकाळी 7 च्या आधी आणि रात्री 8 नंतर फोन करू शकणार नाहीत. हा नियम बँका आणि बिगर बँक वित्त संस्थांना लागू राहील. बँकांकडून कर्ज वसुलीचे काम इतर कंपन्यांना दिले जाते. त्यांनाही हा नियम लागू राहील.
कर्ज योजना तयार करण्याचे किंवा KYC पूर्तता सारखे महत्त्वाची कामे बँकांना आउटसोर्स करता येणार नाहीत. ही कामे बँकेने त्रयस्थ कंपनीला न देता स्वत: करावीत, असे नव्याने प्रस्तावित करण्यात आलेल्या नियमात म्हटले आहे. बँकांकडून कामे इतर कंपन्यांना देण्यात येतात त्यावर अंकुश आणण्यासाठीही नवे नियम प्रभावी ठरतील.
जर बँका त्रयस्थ कंपन्यांना कामे आउटसोर्स करत असतील तरीही ग्राहकांना चांगली सेवा मिळाली पाहिजे. तसेच या कंपन्यांवर बँकांचे लक्ष राहायला हवे, असे आरबीआयने म्हटले आहे. बँकेचे विक्री विभागातील कर्मचारी, वसुली एजंट, थेट विक्री एजंट यांच्यासाठी बँकेने नियमावली आखावी, असेही नियमांत म्हटले आहे. ग्राहकांची फसवणूक न होता अचूक माहिती दिली जावी, हा उद्देशही या नियमांमागे आहे.
बँका आणि त्यांनी नेमलेल्या वसुली एजंटने ग्राहकांना कर्ज वसुलीसाठी धमकी देऊ नये तसेच त्यांना मानसिक छळही करू नये. ग्राहकांशी बोलताना सभ्य भाषा वापरण्याचेही नियमात म्हटले आहे. ग्राहक किंवा त्याच्या कुटुंबियांची वैयक्तिक माहिती जाहीर करण्यासही सक्त मनाई केली आहे. नवे नियम लागू मंजूर झाल्यास कर्जदारांना काही प्रमाणात नक्कीच दिलासा मिळेल.