रिझर्व्ह बँकेने सहकार क्षेत्रातील पाच बँकांवर शुक्रवारी 24 फेब्रुवारी 2023 रोजी निर्बंध लागू केले आहेत. यात महाराष्ट्रातील दोन सहकारी बँकांचा समावेश आहे. आर्थिक परिस्थिती नाजूक झाल्याने रिझर्व्ह बँकेने खरबदारीचे पाऊल म्हणून पाच सहकारी बँकांमधील ग्राहकांवर पैसे काढण्याबाबत मनाई केली आहे. औरंगाबादमधील आदर्श महिला नागरी सहकारी बँक मर्यादित आणि अकलूजमधील शंकरराव मोहीते पाटील सहकारी बँकेवर निर्बंध लागू करण्यात आले.
देशातील पाच बँकांवर कारवाई करण्यात आल्याचे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे. याबाबत आज शुक्रवारी निवेदन जारी करण्यात आले आहे. त्यानुसार या पाच सहकारी बँकांवर पुढील सहा महिने निर्बंध लागू असतील. आर्थिक स्थिती डबघाईला आल्याने रिझर्व्ह बँकेकडून ही कारवाई करण्यात आली आहे. त्यात उत्तर प्रदेशातील लखनऊमधील एचसीबीएल को-ऑप बँक, औरंगाबादमधील आदर्श महिला नागरी सहकारी बँक मर्यादित आणि कर्नाटकातील शिम्शा सहकारी बँक नियमित या बँकांच्या ग्राहकांना आणि ठेवीदारांना पैसे काढण्यास मनाई करण्यात आली आहे. या तीनही बँकांची सध्याची आर्थिक परिस्थिती प्रचंड खालावली असल्याचे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे.
या बँकांवर निर्बंध लागू केल्याने त्यांना नव्याने कर्ज वाटप करणे, ठेवी आणि गुंतवणूक स्वीकारणे, निधी हस्तांतर करणे यासारखी कामे करता येणार नाहीत. तातडीच्या कामांसाठी रिझर्व्ह बँकेची परवानगी घ्यावी लागणार आहे. दरम्यान या पाचही सहकारी बँकांमधील पात्र ठेवीदारांना ठेवींवरील विमा संरक्षण योजनेमधून पाच लाखांपर्यंत भरपाई दिली जाणार आहे.
याशिवाय आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातल्या उर्वकोंडा को ऑपरेटिव्ह टाऊन बँक आणि महाराष्ट्रातल्या अकलूजमधील शंकरराव मोहीते पाटील सहकारी बँकेवर अंशत: निर्बंध लागू असतील, असे आरबीआयने म्हटले आहे. या दोन्ही बँकांचे ग्राहक 5000 रुपयांपर्यंत रक्कम काढू शकतील, असे आरबीआयने म्हटले आहे.