RBI Fine on Banks: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सोमवारी (दि. 26 जून) सोलापूरमधील सिद्धेश्वर को-ऑपरेटीव्ह बँकेवर दंड ठोठावला आहे. सिद्धेश्वर बँकेसह इतर 7 को-ऑपरेटिव्ह बँकांनी आरबीआयच्या नियमांचे पालन न केल्यामुळे हा दंड ठोठावला आहे.
आरबीआयने घालून दिलेल्या नियमांचे पालन न करणाऱ्या 7 बँकांवर दंड लागू केला आहे. यामध्ये देशभरातील 7 को-ऑपरेटीव्हा बँकांचा समावेश आहे. यामध्ये टेक्सटाईल ट्रेडर्स को-ऑप. बँक लिमिटेड, उज्जैन नागरिक सहकारी बँक मर्यादित, पानीहाटी को-ऑप. बँक, द बरहामपूर को-ऑप. अर्बन बँक, सोलापूर सिद्धेश्वर सहकारी बँक, उत्तर प्रदेश को-ऑप. बँक लिमिटेड आणि उत्तरपारा को-ऑप. बँकेचा समावेश आहे.
आरबीआय बँक वेळोवेळी नियम तयार करून त्याचे पालन करण्याबाबत बँकांना सूचना करत असते. या सूचनांचे पालन बँकांकडून होत नसेल तर आरबीआयला बँकिंग रेग्युलेशन अॅक्ट 1950 अंतर्गत दंड वसूल करण्याचा अधिकार आहे. जसे की, आरबीआयने 2019-20मध्ये कार्यरत नसलेल्या बँक खात्यांमध्ये किमान रक्कम नसल्यास त्यावर दंड आकारण्याची सूचना केली होती. त्यानुसार आरबीआयने या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या को-ऑपरेटीव्ह बँकांकडून दंड वसूल केला.
आरबीआयने सोलापूर सिद्धेश्वर सहकारी बँकेवर फक्त 1.50 लाख रुपयांचा दंड लागू केला आहे. तर सर्वाधिक 28 लाख रुपयांचा दंड उत्तर प्रदेश को-ऑप. बँकेवर लावला आहे. तर टेक्सटाईल ट्रेडर्स को-ऑप बँकेवर 4.50 लाख, तर पानीहाटी सहकारी बँक आणि उत्तरपारा सहकारी बँकेवर प्रत्येकी 2.50 लाखांचा दंड लावला आहे आणि उज्जैन नागरिक सहकारी बँक व द बरहामपूर को-ऑप. अर्बन बँकेवर प्रत्येकी 1-1 लाख रुपयांचा दंड लावला आहे.