महागाईचा भडका उडाला असला तरी रिझर्व्ह बँकेने पतधोरणात रेपो दर स्थिर ठेवून कर्जदारांना दिलासा दिला. सलग तिसऱ्यांदा आरबीआयने पतधोरण स्थिर ठेवले आहे. आरबीआयचा रेपो दर 6.5% आहे. व्याजदर स्थिर राहिल्याने बँकांकडून देखील कर्जदरात वाढ होण्याची शक्यता कमी आहे.
रिझर्व्ह बँकेने आज गुरुवारी 10 ऑगस्ट 2023 रोजी पतधोरण जाहीर केले. रेपो दर 6.5% असून रिव्हर्स रेपो रेट 3.5% इतके आहे. महागाईबाबत सध्या वेट अॅंड वॉचची भूमिका घेण्याचा निर्णय घेतल्याचे गव्हर्नर दास यांनी सांगितले. सलग तिसऱ्या पतधोरणात बँकेने रेपो दर स्थिर ठेवला आहे. यापूर्वी फेब्रुवारी 2023 मध्ये रेपो दरात 0.25% वाढ केली होती.
रिझर्व्ह बँकेने प्रमुख महागाईचा दराचे उद्दिष्ट 4% ठेवले आहे. जून महिन्यात ग्राहक मूल्यावर आधारित महागाईचा दर 4.81% इतका आहे. प्रमुख महागाई दर 5.1% इतका होता. मे मध्ये तो 5.2% इतका होता. जूनमध्ये महागाईमध्ये किरकोळ घसरण झाली होती.
मात्र काही राज्यांमध्ये अतिवृष्टीने महापूर आला होता. त्यामुळे शेतीचे नुकसान झाले. अल निनोचा परिणाम मॉन्सूनवर दिसून आला. आणखी काही महिने महागाईचा स्तर असाच राहण्याची शक्यता आहे.
आरबीआयने महागाईबाबत सुधारित अंदाज व्यक्त केला आहे. मॉन्सून यंदा सामान्य राहिला तर महागाई काही प्रमाणात सौम्य होईल, असा अंदाज पतधोरणात व्यक्त करण्यात आला आहे. मात्र आधीचा 5.1% महागाईचा अंदाज सुधारुन तो 5.4% इतका केला आहे.
विकासदरात बाबत बँकेने 6.5% चा अंदाज कायम ठेवला आहे. वर्षातील पहिल्या तिमाहीत जीडीपी 8.0% राहण्याची शक्यता आाहे. दुसऱ्या तिमाहीत 6.5% आणि तिसऱ्या तिमाहीत 6% आणि चौथ्या तिमाहीत 5.7% राहण्याची शक्यता आहे. चालू आर्थिक वर्षात जीडीपी 6.5% राहील, असे बँकेने म्हटले आहे.
रेपो दर जैसे थेच ठेवल्याने गृहनिर्माण क्षेत्राला फायदा होण्याची शक्यता आहे. मागील तीन पतधोरणात व्याजदर वाढलेला नाही. सध्या रिअल इस्टेटमध्ये सकारात्मक वातावरण आहे. होम लोनचे दर स्थिर असल्याने घर खरेदीकडे ग्राहकांचा ओढा आहे. खासकरुन लक्झुरी घरांच्या विक्रीला फायदा होईल, असे अॅनरॉक कंपनीचे प्रमुख अनुज पुरी यांनी सांगितले.