रिझर्व्ह बँकेने आज गुरुवारी 10 ऑगस्ट 2023 रोजी जाहीर केलेल्या पतधोरणात कर्जदारांच्या दृष्टीने मोठा निर्णय घेतला. व्याजदर श्रेणीनुसार कर्ज निवडण्याची प्रक्रिया सोपी आणि पारदर्शक होणार आहे. रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयामुळे गृह कर्ज, वाहन कर्ज आणि इतर कर्जांमधील लाखो कर्जदारांना फायदा होणार आहे.
रिझर्व्ह बँकेने पतधोरण जाहीर करताना काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यातील एक निर्णय ज्यांनी कर्ज घेतली आहेत आणि EMI भरत आहेत अशांसाठी फायदेशीर ठरणार आहे.
गृह कर्ज हस्तांतरण प्रक्रिया सोपी आणि पारदर्शक करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने एक महत्वाचा निर्णय घेतला. बदलत्या व्याजदरांनुसार (Floating Interest Rate) कर्ज घेतलेल्या कर्जदारांना आता निश्चित व्याजदरामध्ये (Fixed Interest Rate) आपले कर्ज हस्तांतरित करता येईल.
फ्लोटिंग इंटरेस्ट रेट अर्थात बदलता व्याजदर हा बाजारातील आर्थिक परिस्थितीनुसार बदलत असतो. मागील दोन वर्षात महागाई नियंत्रणासाठी रिझर्व्ह बँकेने रेपो दरात वाढ केली होती. त्याचा फटका बदलत्या व्याजदराने कर्ज घेतलेल्या कर्जदारांना बसला होता.
अशा कर्जदारांना फ्लोटिंग ऐवजी फिक्स्ड इंटरेस्ट रेटची निवड करण्यास रिझर्व्ह बँकेने परवानगी दिली. फ्लोटिंग इंटरेस्ट रेटवरील कर्जांना फिक्स्ड रेटमध्ये हस्तांतर करण्याबाबत नियमावली आणखी पारदर्शक करण्यात आल्याचे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितले. ही नियमावली लवकरच अस्तित्वात येईल, असे दास यांनी सांगितले.
कर्जदारांना फ्लोटिंग इंटरेस्ट रेटवरुन फिक्स्ड इंटरेस्ट रेटवर हस्तांतर करण्यापूर्वी बँकेशी कर्जाची मुदत आणि ईएमआय याचे स्पष्टीकरण करुन घेणे आवश्यक असे दास यांनी म्हटले आहे. लोन हस्तांतर करताना लागणारे शुल्क आणि नियम समजून घ्यावेत, असे दास यांनी आवाहन केले आहे. रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयामुळे कर्जदारांचे हित जपले जाण्याच्या दृष्टीने उचलले हे एक मोठे पाऊल असल्याचे बोलले जाते.
सर्वसाधारणपणे गृह कर्जदार फिक्स्ड रेटने कर्ज घेतात. सध्या फ्लोटिंग आणि फिक्स्ड इंटरेस्ट रेटमध्ये कर्ज हस्तांतर करण्यास परवानगी आहे. मात्र यासाठी एकूण कर्ज रकमेच्या 0.50% ते 2% शुल्क भरावे लागते. यापूर्वी ऑक्टोबर 2019 पासून सर्व फ्लोटिंग रेट इंटरेस्टची कर्ज एक्स्टर्नल बेंचमार्कशी लिंक करण्यात आली आहेत.