आता रक्षाबंधन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे बहिणींची आपल्या भावासाठी चांगली राखी घेण्याची शोधाशोध सुरू आहे. तर भावांचीही बहिणीला हटके गिफ्ट देण्याची तयारी सुरू आहे. पण, तुम्ही दरवर्षी प्रमाणे चाॅकेलट, ड्रेस आणि घड्याळ गिफ्ट द्यायचा विचार करत असल्यास, आम्ही तुमच्यासाठी काही हटके गिफ्ट घेऊन आलो आहोत. जे बहिणीला आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्यास मदत करणार आहेत. त्यामुळे यंदाची रक्षाबंधन कायम लक्षात राहण्यासाठी तुम्ही देखील बहिणीला हे गिफ्ट देऊन, सरप्राईज करु शकता. कालनिर्णयानुसार ऑगस्टच्या 30 तारखेला रक्षाबंधन असणार आहे. त्यानुसार आत्तापासूनच तयारीला लागा, म्हणजे वेळेवर धावपळ होणार नाही.
Table of contents [Show]
SIP
SIP म्हणजेच सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन हा म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याचा चांगला पर्याय आहे. याद्वारे तुम्ही तुमच्या बहिणीसाठी एक फंड निवडून त्यात एक ठराविक रक्कम किंवा महिन्यानुसार पैसे टाकून गुंतवणूक करु शकता. त्यामुळे तिला तिच्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी या पैशांची मदत होईल. SIP मध्ये तुम्ही 100 रुपयांपासूनही गुंतवणूक सुरू करू शकता. त्यामुळे किती ओवाळणी SIP द्वारे टाकायची आहे, हे तुम्हालाच ठरवावे लागेल.
हेल्थ इन्शुरन्स पाॅलिसी
या यादीत तुमच्यासाठी हेल्थ इन्शुरन्स दुसरा पर्याय आहे. कारण, प्रत्येकांनाच आपल्या बहिणीची काळजी असते, त्यामुळे तुम्ही हेल्थ इन्शुरन्स पाॅलिसी बहिणीच्या नावाची घेऊ शकता. त्यामुळे आरोग्यासंबंधी अडचणींच्यावेळी तिला त्या पाॅलिसीचा फायदा होऊ शकतो. मार्केटमध्ये खूप पाॅलिसी उपलब्ध आहेत. त्यापैकी एक घेऊन तुम्ही त्याचा प्रीमियम भरू शकता.
गोल्ड
महिलांना सर्वाधिक काही आवडत असेल तर ते म्हणजे गोल्ड. त्यामुळे तुम्ही गोल्ड द्यायचा विचार करत असल्यास, तुमच्याजवळ डिजिटल गोल्ड हा पर्याय उपलब्ध आहे. तुम्ही डिजिटली गोल्ड विकत घेऊन गिफ्ट करू शकता. बरेच अॅप सध्या गोल्ड खरेदीची सुविधा देत आहेत. त्यामुळे डिजिटली गोल्ड दिल्यास, अडचणींच्या वेळी किंवा भाव वाढल्यावर विकाल तर त्वरित पैसे खात्यावर ट्रान्सफर होतात. त्यामुळे गिफ्टसाठी हा सुद्धा चांगला पर्याय आहे.
सरकारी योजना
बहिण लहान असल्यास, तिच्या चांगल्या भविष्यासाठी सरकारच्या सुकन्या समृद्धी योजनेतही तुम्ही गुंतवणूक करु शकता. कारण, या योजनेत चांगला व्याजदर मिळतो. त्यामुळे हा पैसा भविष्यात तिला तिच्या शिक्षणासाठी किंवा इतर आर्थिक अडचणींसाठी कामी येऊ शकतो.
FD
तुम्ही बहिणीच्या नावाची FD म्हणजेच फिक्स डिपाॅझिट करु शकता, यामध्ये पैसे गुंतवल्यास चांगला व्याजदर मिळू शकतो. त्याचा अवधी तुमच्या सोयीनुसार तुम्ही ठरवू शकता. तसेच, तुम्ही कमीतकमी 1000 रुपयांपासूनही FD गुंतवणकू करू शकता. त्यामुळे तुम्ही जर बहिणीला पैसे द्यायचे ठरवत असल्यास, त्याबदल्यात FD चांगला पर्याय आहे.
अशाप्रकारे वर दिलेल्या पर्यायांपेकी एक गिफ्ट तुम्ही तुमच्या बहिणीला नक्कीच देऊ शकता. हे गिफ्ट तिला आर्थिक मदत करणारे तर ठरेल. पण त्याचबरोबर त्याचा तिला आधारही होईल.