प्रवासी कामगारांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. भारतीय रेल्वेने रोजगारासाठी अन्य राज्यांमध्ये जाणाऱ्या प्रवासी कामगारांसाठी स्पेशल ट्रेन सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे बोर्ड आपल्या नियमित वेळापत्रकाचा भाग म्हणून देशभरातील स्थलांतरित कामगार आणि मजूर यांसारख्या कमी उत्पन्न गटांसाठी बिगर वातानुकूलित (Non AC), सामान्य वर्गाच्या (General Train) गाड्या चालवण्याची योजना आखत आहे.
Table of contents [Show]
कायमस्वरूपी चालणार या ट्रेन्स
उन्हाळ्याच्या सुट्टीत किंवा सणासुदीला अशा प्रकारच्या स्पेशल ट्रेन्स रेल्वे बोर्डाकडून सोडल्या जातात. मात्र अनेक स्थलांतरित कामगार वर्षभर प्रवास करत असतात. गाड्यांची संख्या मर्यादित असल्याने आणि प्रवासी संख्या अधिक असल्याने कामगारांना कन्फर्म तिकीट मिळत नाही. 1-2 दिवसांच्या प्रवासासाठी त्यांनी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. या सगळ्या पार्श्वभूमीवर स्थलांतरित कामगारांना समोर ठेऊन अशा नव्या गाड्या कायमस्वरूपी चालवण्याचा सरकारचा विचार आहे.
प्रतीक्षा यादी कमी होईल
याबाबत बोलताना रेल्वे बोर्डाच्या अधिका-यांनी सांगितले की, नवीन गाड्या चालवण्याचा निर्णय एका सखोल अभ्यासानंतर घेण्यात आला आहे. रेल्वे बोर्डाला या अभ्यासात असे आढळले आहे की काही राज्यांमध्ये प्रतीक्षा यादी ही कायम अधिक असते आणि त्यात प्रवास करणारे नागरिक हे कमी उत्पन्न गटातील आहेत. याचे विश्लेषण करताना रोजगारासाठी अन्य राज्यात जाणारे हे कामगार असल्याचे निदर्शनास आले आहे. ज्या राज्यांमधून सर्वाधिक स्थलांतर होत आहे, अशा राज्यांमध्ये या स्पेशल ट्रेन सुरु करण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे. अतिरिक्त गाड्यांमुळे ट्रेनची प्रतीक्षा यादी कमी होईल असा अंदाज आहे.
कधीपासून सुरु होणार ट्रेन?
प्रस्तावित नवीन रेल्वे गाड्या जानेवारी 2024 पासून धावण्याची शक्यता आहे. या गाड्या बिगर वातानुकूलित असतील आणि त्यांना फक्त स्लीपर आणि सामान्य श्रेणीचे डबे असतील असे रेल्वे बोर्डाने म्हटले आहे. तसेच या नवीन प्रकारच्या गाड्यांची नावे रेल्वेने अद्याप ठरवलेली नाहीत. लवकरच याची घोषणा केली जाईल असेही सांगण्यात आले आहे.
या राज्यांमधून धावणार स्पेशल ट्रेन्स
रेल्वे बोर्डाच्या म्हणण्यानुसार, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, छत्तीसगड, ओडिशा, पश्चिम बंगाल, पंजाब, आसाम, गुजरात, दिल्ली, तामिळनाडू, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश या राज्यांसाठी नवीन विशेष गाड्यांचे नियोजन केले जात आहे. रेल्वे बोर्डाच्या अधिका-यांनी सांगितले की या राज्यांतील बहुतेक कुशल-अकुशल कामगार, कारागीर, मजूर आणि इतर कामासाठी महानगरे आणि मोठ्या शहरांमध्ये जातात. या लोकांसाठी अशा ट्रेन चालवल्या जातील, ज्यामध्ये फक्त स्लीपर-जनरल श्रेणीचे डबे बसवले जातील.