भारतीय रेल्वेकडून आपल्या ग्राहकांसाठी अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. आरक्षित तिकीट बुकिंगच्या सुविधेप्रमाणे आता रेल्वेने जनरल बोगीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी देखील घरबसल्या तिकीट काढण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे यापुढे प्रवाशांना आता जनरल तिकीटासाठी रांगेत उभे राहण्याची गरज पडणार नाही. जनरल तिकीट (unreserved train tickets) बूक करण्यासाठी भारतीय रेल्वेने UTS हे अँड्रॉइड मोबाइल तिकीट ॲप सुरू करण्यात आले आहे.
जनरल तिकिटासाठी ॲप
यापूर्वी रेल्वेच्या स्लीपर एसी कोचचे तिकीट घरबसल्या ऑनलाईन काढण्याची सोय उपलब्ध होती. यासाठीअनेक कंपन्यांकडून ऑनलाईन तिकीट बुकींगची सेवा देतात. मात्र, ज्या प्रवाशांना आरक्षित तिकीट उपलब्ध झाले नाही किंवा आयत्यावेळेला प्रवास करणाऱ्या प्रवाशांना जनरल तिकीट काढून प्रवास करावा लागतो. इतकेच नाही तर भारतात अनेक प्रवासी असे आहेत की जे स्वस्तात प्रवास होतो म्हणून जनरल तिकीट काढून प्रवास करतात. मात्र जनरल तिकीट काढणे हे एक प्रकारे झंझटीचे काम आहे. हे तिकीट काढण्यासाठी स्थानकावर जाऊन गर्दीत रांगेत उभे राहून तिकीट काढावे लागते. मात्र आता रेल्वेने प्रवाशांसाठी ॲप उपलब्ध करून दिले आहे.त्या अॅपचा कसा वापर करायचा याबाबतची माहिती जाणून घेऊयात
UTS अँड्रॉइड मोबाइल तिकीट ॲप
भारतीय रेल्वेने आता जनरलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी पेपरलेस तिकीटाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.रे ल्वेकडून विना आरक्षित तिकीट बूक करण्यासाठी UTS अँड्रॉइड मोबाइल तिकीट ॲप उपलब्ध करून देण्यात आले आहे. यूटीएस ऑन मोबाइल ॲप (uts on mobile) हे भारतीय रेल्वेचे अधिकृत अँड्रॉइड मोबाइल तिकीट ॲप आहे. जे अनारक्षित ट्रेन तिकीट बुक करण्यासाठी आहे. या ॲपच्या माध्यमातून प्रवाशांना आता मोबाईलवरच जनरलचे तिकीट बूक करता येणार आहे. मात्र, या अॅपच्या माध्यमातून सतरा वर्षांखालील व्यक्तीसाठी तिकीट उपलब्ध होणार नाही.
कसे काढायचे तिकीट?
गूगल प्ले स्टोअरवरून तुम्हाला UTS हे ॲप डाऊनलोड करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला स्वत:चे खाते लॉगिन करावे लागेल. लॉगिन झाल्यानंतर तुम्हाला तिकीट बुक करण्यासंबधीत माहिती भरायची आहे. तुम्हाला कुठून कुठपर्यंत प्रवास करायचा आहे. किती तिकीट पाहिजेत याची माहिती भरावी लागेल. त्यानंतर तुम्हाला पेपरलेस तिकीट हा पर्याय निवडायचा आहे. तसेच रेल्वेचे विविध मार्ग असतील तर तुम्हाला ज्या मार्गाने जायचे आहे. त्याची माहिती द्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला पेमेंट करण्यासाठी ॲपमधील Rwallet या पर्यायाचा वापर करू शकता किंवा इतर पर्यायाच्या माध्यमातून म्हणजेच क्रेडिट, डेबिट कार्ड, नेट बँकिंग आणि यूपीआयच्या माध्यमातून देखील पेमेंट करू शकता. अशा प्रकारे तुम्हाला तुमचे जनरल तिकीट घरबसल्या उपलब्ध होईल.